साधुग्रामच्या जागेत डेब्रिज

कडक कारवाई करण्याची मागणी
साधुग्रामच्या जागेत डेब्रिज

पंचवटी । वार्ताहर

तपोवनाच्या मुख्य रस्त्यालगत साधुग्रामच्या भागातील पूर्व बाजूस गेल्या कित्येक महिन्यांपासून डेब्रिज टाकण्यात येत आहे. या मार्गापासून बटूक हनुमान मंदिराकडे जाण्याच्या रस्त्यालगतच्या भागात डेब्रिज व मातीचे मोठमोठे ढिगारे तयार झालेले आहेत. साधुग्रामच्या या पवित्र जागेत अशा प्रकारची घाण करण्याचा कुणालाही अधिकार नाही. येथे डेब्रिज टाकण्यास पुरोहित व साधू-संतांनी विरोध केला असून हा प्रकार त्वरित थांबवण्यात आला नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आरक्षित असलेली जागा कुंभमेळ्याच्या पर्वण्या झाल्यानंतर पडून असते. या जागेत झाडे लावण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही कामासाठी त्याचा वापर केला जाऊ नये, असे पुरोहित संघाचे म्हणणे आहे. असे असताना या जागेत डेब्रिज टाकण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू आहे. हे प्रकार थांबण्याऐवजी त्यात वाढच होत आहे. महापालिका प्रशासन या बाबीकडे दुर्लक्ष करत आहे. केवळ फलक लावून हे प्रकार थांबणारे नाहीत. अशा प्रकारे डेब्रिज टाकून ही साधू-महंतांची पवित्र जागा खराब करण्यात येत असल्याचे खपून घेतले जाणार नाही.

नाशिकला धार्मिक पर्यटनासाठी येणारे भाविक तपोवनास आवर्जून भेट देतात. त्यांना अशा प्रकारचे ओंगळवाणे तपोवनातील साधुग्रामचे दर्शन घडवणार का? असा सवाल पुरोहितांनी केला आहे. साधुग्रामच्या जागेत नाशिक महापालिकेने सूचना फलक लावला आहे. त्यात तपोवन परिसरात कुठल्याही प्रकारचे माती, डेब्रिज मटेरियल टाकण्यास मनाई आहे. टाकल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. या फलकावर पाचशे मीटर लिहून त्याच्या दोन्ही बाजूला बाण दर्शवण्यात आले आहेत. नेमक्या याचा फलकापासून जवळच डेब्रिज, माती टाकण्यात येत आहे.

तपोवनाच्या जागेत डेब्रिज टाकून ही पवित्र जागा खराब करण्यात येत आहे. याला आम्ही अगोदरपासूनच विरोध केलेला आहे. साधुग्रामच्या जागेत अशा प्रकारची घाण करण्यात येऊन नये. महापालिका प्रशासनाने कडक कारवाई केली पाहिजे.

- महंत भक्तिचरणदास महाराज

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com