सिलिंडर स्फोटातील सातवी जखमीचा मृत्यु

मदतीसाठी उपोषणाची धमकी
सिलिंडर स्फोटातील सातवी जखमीचा मृत्यु

जुने नाशिक | Nashik

वडाळानाका भागातील संजरीनगर इमारतीत गेल्या आठवड्यात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला होता. या दुर्घटनेत आठ लोक जखमी झाले होते. यापैकी परवा (दि.१०) मध्यरात्री मुस्कान वलीउल्ला अन्सारी (२१) या युवतीचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.

यामुळे दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता सातवर पोहचला आहे. दरम्यान जिल्हाधिकारींंनी पीडितांना तातडीने मदत जाहीर न केल्यास उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

गॅस सिलिंडरची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत सय्यद कुटुंबातील चौघांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला होता. तसेच अन्सारी कुटुंबातील शोएब वलीउल्ला अन्सारी (२८) व त्याचा सख्खा भाऊ रमजानचीही प्राणज्योत परवा मालवली होती. यानंतर मुस्कानचेही निधन झाले. घरातील कर्ते तरुण मुले नियतीने कायमची हिरावून नेली यामुळे दोन्ही कुटुंबियांवर आभाळ फाटले आहे.

शहरातील अशाप्रकारच्या दुर्घटनेत सात बळी जाण्याची ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे. या दुर्घटनेमुळे ही दोन्ही कुटुंबे पूर्णतः उध्वस्त झालेली असून त्यांच्या पुर्वसनासाठी परिसरातील युवकांनी मदत मोहीम उघडली आहे. जुम्माच्या नमाजानंतर शहरातील मशिदीत आर्थिक मदत गोळा केली गेली.

या मोहिमेत परवा पर्यंत सुमारे पावणे दोन लाख रुपयांचा चंदा गोळा झाला होता, अशी माहिती मुदस्सर सय्यद यांनी दिली. दरम्यान एवढ्या मोठ्या दुर्घटनेनंतर देखील स्थानिक लोकप्रतिनिधींनी दुर्घटना पीडितांची मदत केली नसल्याचा आरोप परिसरातील लोकांनी केला आहे.

तसेच स्थानिक नगरसेवकाबरोबर मध्य नाशिकच्या आमदारांनी देखील पीडितांकडे पाठ फिरविली, त्यांची मदत तर दूरच घटनास्थळी देखील भेट दिली नाही, याबद्दल काही लोकांनी संताप व्यक्त केला.

केवळ नगरसेविका समीना मेमन यांनी घटनास्थळी भेट दिल्याची माहिती मुदस्सर सय्यद यांनी दिली. दरम्यान या पीडितांना जिल्हाधिकारी यांनी तातडीने मदत जाहीर न केल्यास उपोषण करण्याचा इशारा परिसरातील सामाजिक कार्यकर्ते नजमुल खान यांनी दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com