विवाहितेचा मृत्यू; सहा डॉक्टरांविरूद्ध गुन्हा दाखल

विवाहितेचा मृत्यू;  सहा डॉक्टरांविरूद्ध गुन्हा दाखल

चांदवड । प्रतिनिधी chandvad

तालुक्यातील मंगरूळ ( Mangrul ) येथील नवविवाहिता प्रियंका निरभवणे ( Priyanka Nirbhavane )हिच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा आरोग्य समितीचा अहवाल रात्री उशिरा पोलिसांना प्राप्त झाल्याने सहा डॉक्टरांविरूध्द चांदवड पोलीस ठाण्यात ( Chandvad Police Station )गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी कारवाई करताच शोकाकूल कुटूंबीय व ग्रामस्थांनी मध्यरात्री येथील स्मशानभुमीत शोकाकुल वातावरणात प्रियंकाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

मंगरूळ येथील नवविवाहिता प्रियंका विकी निरभवणे हीस प्रसूतीसाठी चांदवड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सिझेरियन शस्त्रक्रियद्वारे प्रसूती होवून प्रियंकाने गोंडस बाळास जन्म दिला. मात्र काही दिवसातच प्रियंकाची तब्येत बिघडल्यामुळे तिला परत येथील खासगी रूग्णालयात आणण्यात आले. मात्र प्रकृती अधिक बिघडल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पिंपळगाव बसवंत येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले. घरी परतल्यानंतर परत त्रास जाणवल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार परत पिंपळगाव येथील खाजगी रूग्णालयात शस्त्रक्रिया केली गेली. मात्र, काहीही फरक न पडल्याने नाशिक येथील नामांकित रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले. मात्र प्रकृती अधिक गंभीर होत असल्याने अखेर उपचारासाठी मुंबई येथे पाठवण्यात आले .

उपचारासाठी लाखो रुपये घेवून सुध्दा डॉक्टरांच्या हलगर्जीपणा व निष्काळजीपणामुळेच प्रियंकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त झालेल्या कुटूंबीय, नातेवाईकांनी प्रियंकाचा मृतदेह चांदवड पोलीस स्टेशन आवारात ठेवत ठिय्या आंदोलनास प्रारंभ केला. जोपर्यंत प्रियंकाच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल होऊन अटक होत नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या आंदोलनाची माहिती मिळताच मनमाड पोलीस उपअधिक्षक समीरसिंग साळवे यांनी तातडीने चांदवडला येऊन आंदोलन करणार्‍या नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

मात्र नातेवाईक ऐकण्याचे मनस्थितीत नव्हते. अखेर मालेगाव येथून अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांनी नातेवाईकांची समजूत काढली. तसेच रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयाचा अहवाल प्राप्त झाल्याने याप्रकरणी मृत विवाहितेचा पती विकी पंडित निरभवणे यांच्या फिर्यादीवरून औषध उपचारांमध्ये निष्काळजीपणा व हलगर्जीपणा केल्याप्रकरणी पोलिसांनी डॉ. हेमंत मंडलिक नाशिक, डॉ. दीपक पवार चांदवड, डॉ. योगिता दीपक पवार चांदवड, डॉ. उमेश आहेर पिंपळगाव बसवंत, डॉ. कविता आहेर पिंपळगाव बसवंत व डॉ. रोहन मोरे अशा सहा डॉक्टरांविरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक सुरेश चौधरी हे करत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com