नाशिक । Nashik

भारत नगर परिसरातील गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात गंभीररीत्या भाजलेल्या चौघांचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात आज मृत्यू झाला.

रशीद लतिफ अन्सारी (30), मोहमंद अमजद अब्दुल रौफ अन्सारी (30), मोहमंद मुर्तजा अन्सारी (30), मोहमंद अफताफ आलम (19, चौघे रा. भारतनगर) अशी मृतांची नावे आहेत. उपचार सुरू असताना चौघांचाही मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकार्यांनी तपासून घोषीत केले.

मंगळवारी (दि.1) सकाळच्या सुमारास झालेल्या गॅस गळती झाल्याने स्फोट झाला होता. गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात परिसरात आगीचे लोट पसरले होते. या घटनेत आगीने अनेक घरांना लक्ष केले होते. परिसरातील नागरीक आणि पोलिसांनी जखमींना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते.

भारत नगर परिसरात अन्सारी कुटूंबिय भाडेतत्वाने राहत होते. घरात राहत असताना ते अनधिकृतपणे व्यावसायिक वापराचे गॅस सिलींडर वापरत होते. त्या गॅसची नळी तुटलेली माहिती असताना देखील त्याकडे दुर्लक्ष करुन अन्सारी कुटूंबियाने गॅसचा वापर सुरुच ठेवल्याचे पोलीस तपासात समोर आले.

त्यामुळे मंगळवारी (दि.1) गॅसगळती होऊन झालेल्या स्फोटात सहा जण भाजले. याप्रकरणी भाजलेल्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच घरमालक मोहम्मद कुतुबुद्दीन अन्सारी निजाम आयुब खान (21, रा. कल्याण, जि. ठाणे) याने भारत नगर येथील घरात भाडेकरु ठेवलेले असतानाही त्याची माहिती पोलिसांना न दिल्याबद्दल त्याच्याविरोधातही मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झाला.