
सटाणा l Satana
बागलाण तालुक्यातील भाक्षी गावातील जवानाच्या निधनाची बातमी आज सकाळी प्राप्त झाली.
स्वप्नील रौन्दळ असे या जवानाचे नाव आहे. जम्मू काश्मीर सीबीएस भालेरा सेक्टरमध्ये प्रशिक्षण सुरू असताना एका दुर्घटनेत या जवानाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
या घटनेमुळे आज संपूर्ण गावावरच शोककळा पसरली असल्यामुळे एकाही घरात गुढ्या उभारल्या गेल्या नाहीत.
दिवंगत स्वप्नील यांचे प्राथमिक शिक्षण भाक्षी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले होते. तर 5 ते 10 पर्यंतचे शिक्षण सटाणा येथील मराठा हायस्कुलमध्ये झाले होते. स्वप्नील यांच्या निधनाने बागलाण तालुक्यात गुढीपाडव्याच्या दिवशीच शोककळा पसरली आहे.
दिवंगत जवान स्वप्नील रौन्दळ चार वर्षांपूर्वी सैन्यात भरती झाला होता. २०१६ या वर्षी प्रशिक्षण पूर्ण करून स्वप्नील सैन्यात दाखल झाले होते.
पहिली पोस्टिंग राजस्थान येथे मिळाली होती. यानंतर नुकतीच त्यांची पोस्टिंग जम्मू काश्मीर सीबीएस भालेरा सेक्टरमध्ये झाली होती. याठिकाणी अंतर्गत प्रशिक्षण त्यांचे सुरू होते.
यादरम्यान आग लागल्याची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत स्वप्नील रौन्दळ यांचा मृत्यू झाल्याचे समजते. स्वप्नील यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे.