गाेदाघाट पडला ओस..!

रेलचेल थांबली; धार्मिक विधीही रखडले
गाेदाघाट पडला ओस..!

नाशिक | Nashik
कराेनाच्या दुसऱ्या लाटेला थाेपविण्यासाठी नाशिक शहर (दि. १२) पासून कडकडीत बंद ठेवण्यात आले. लाॅकडाऊनच्या पहिल्याच दिवशी काही नागरिकांना किराणा घेण्यापासून धार्मिक विधी, श्राद्ध पार पाडण्यासाठी धावाधाव करावी लागली. मात्र त्यातही त्यांना अपयश आल्याने अनेकांना उदास हाेऊन माघारी परतावे लागले.

दुसरीकडे पाेलीसांनी गर्दीच्या ठिकाणी लक्ष केंद्रीत केल्याने तसेच किरकाेळ, छाेट्या माेठ्या दुकानदार, व्यावसायिकांनी लाॅकडाऊन पाळल्याने अनेक ठिकाणी कडक लाॅकडाऊन यशस्वी झाल्याचे पाहायला मिळाले. बुधवारी दुपारपासून पंचवटी पोलिसांनी नाकाबंदी, मास्क न घालता फिरणाऱ्यांसह उघड्यावरील विक्री अशा विविध पातळ्यावर कारवाया केल्या. दुपारनंतर मास्क न वापरणारे, विनाकारण फिरणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाया केल्या.

तासाभराच्या कारवायानंतर शहरात सगळीकडे शुकशुकाट पाहायला मिळाला. दरम्यान, हिंदूंचा सण अक्षय्य तृतीया आणि मुस्लिमांची रमजान ईद शुक्रवारी (ता. १४) एकाच दिवशी आहे. त्यात प्रशासनाने लॉकडाउन जाहीर केल्याने अक्षय्य तृतीयेसाठी आंबे आणि रमजान ईदसाठी फळे खरेदी करण्यासाठी नागरिकांनी पेठ रोडवरील फ्रूट मार्केटमध्ये गर्दी केली होती.

याठिकाणी असलेल्या किराणा दुकानांत किराणा खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी कर्मचाऱ्यांसोबत किराणा मालाची दुकाने बंद करुन नागरिकांना घरी पाठविल्याने गर्दी कमी झाली. पाेलिसांनी दुपारनंतर मखमलाबाद नाका, निमाणी, पेठराेड, ड्रीम कॅसल, पंचवटी कारंजा आदी भागात गस्त सुरु ठेवली. तसेच मालेगाव स्टॅन्ड येथे नाकाबंदी करुन विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली. तसेच काहींना लाठीचा प्रसाद दिला.

धार्मिक विधी, श्राद्धांसाठी धावाधावमृत नातलगांचे धार्मिक विधी, श्राद्ध करण्यासाठी गाेदाघाटावर गर्दी असते. मात्र, दुपारी बारावाजेनंतर कडक लाॅकडाऊनची अंमलबजावणी हाेण्याच्या निर्णयाने अनेकांनी पहाटे ५ वाजेपासूनच रामकुंड, गाेदाघाटावर गर्दी केली हाेती.

जे नातलग लवकर आले, त्यांचे विधी लवकर उरकले. मात्र जे सकाळी ११ नंतर आले, त्यांना ताटकळत राहावे लागले. त्यांना पुराेहितांची शाेधाशाेध करावी लागली. असे करता करता अनेकांना पूजाविधी न करताच घरी परतावे लागले.

गर्दीचा उच्चांक
कडक लाॅकडाऊन लागणार असल्याने नागरिकांनी पेठराेड, बेकरी काॅर्नर, रामकुंड, पंचवटी कारंजा येथे आवश्यक साहित्याची खरेदी करण्यासाठी माेठी गर्दी केली. बेकरीचे पदार्थ, भाजीपाला, किराणा, घरगुती साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी साेशल डिन्स्टन्स फाट्यावर मारून नियमांना तिलांजली दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com