सातपूर । प्रतिनिधी Satpur

निमात सत्तेवरून रंगलेला वाद अद्यापही मिटताना दिसत नाही. उलट प्रत्येक टप्प्यावर या वादाला नवनवे वळण मिळताना दिसत आहे. धर्मदाय उपआयुक्तांनी या विषयी तुम्हीच एकत्र या, चर्चा करा आणि मार्ग शोधा, असा सल्ला देत 15 डिसेंबर रोजी याबाबतची पुढील सुनावणी असल्याचे स्पष्ट केले.

याप्रकरणी यापूर्वी धर्मदाय उपआयुक्त कांचनगंगा सुपाते- जाधव यांनी दिलेल्या निकालानुसार ‘फिट पर्सन’ निवडीची सुनावणी धर्मदाय उपआयुक्तांकडे सुरू आहे. या सुनावणीदरम्यान दोन्ही गटांसह निमाच्या वकिलांनी आपले म्हणणे मांडले. यावेळी निमाचे वकील विनयराज तळेकर यांनी ‘फिट पर्सन’ची निवड कोणत्या कायद्याला अनुसरून केली जाईल, असा सवाल उपस्थित केला.

जर अवैध कारभार, गैरकारभार, फसवणूक आदींबाबत 41 (ड) अंतर्गत अर्ज दाखल असता तर ‘फिट पर्सन’ची निवड करण्याबाबत विचार करणे शक्य होते. मात्र तशी परिस्थिती नसताना ‘फिट पर्सन’ निवडला जाऊ शकत नाही, असा युक्तिवाद केला. त्यास काळजीवाहू गटाचे अॅड. अतुल गर्गे, अॅड. गिरीश उगले, तसेच विश्वस्त समिती व विशेष कार्यकारी समितीचे वकील अॅड. एन.एम. सय्यद यांनीही सकारात्मक मत व्यक्त केले. यावेळी काळजीवाहू गटाच्या वकिलांनी निवडणूक प्रक्रिया सुरू असताना विश्वस्त समितीकडून नेमणुका करणे घटनेला अनुसरून नसल्याचे धर्मदाय उपआयुक्तांच्या निर्दशनास आणून दिले.

यावेळी धर्मदाय उपआयुक्तांनी पूर्वीच्या प्रलंबित पंधरा वर्षात म्हणजे 1983 ते 1998 पर्यंत चेंज रिपोर्ट का दाखल केले नाहीत? याबाबतची विचारणा केली व धर्मदाय उपआयुक्तांनी निमाच्या कार्यकारी सचिव सोनाली देवरे यांना संपूर्ण रेकॉर्डची मागणी करीत, प्रत्येकवर्षी अध्यक्षांची नेमणूक केली की नाही, याबाबतची खात्री करून घेतली. तसेच या प्रश्नावर तुम्ही सर्व वयाने मोठे असून एकत्र या, चर्चा करा आणि मार्ग शोधा, असा सल्ला धर्मदाय उपआयुक्तांनी दिला. यावेळी तुषार चव्हाण, श्रीपाद कुलकर्णी, मंगेश पाटणकर, आशिष नहार आदी उपस्थित होते.