दिंडोरी । Dindori

‘ हर हर महादेव, बम... बम...भोले... मार्कंडेय ऋषी की जय, सप्तशृंगी माते की जय’ चा जयघोष करीत सोमवती अमावस्येनिमित्त 20 हजारांवर भाविक मार्कंडेय पर्वतावर हजेरी लावत मार्कंडेय ऋषींच्या मुर्तीपुढे लीन झाले.

करोनाच्या पार्श्वभुमीवर 23 मार्च व 20 जुलैच्या सोमवती अमावस्येच्या मार्कंडेय पर्वतावरील सोमवती यात्रोत्सव प्रशासनाने रद्द केल्याने यात्रोत्सवाची परंपरा खंडीत होवून भाविकांना दर्शनास मुकावे लागले होते. मात्र 16 नोव्हेंबरला दिपावली पाडव्यापासून राज्यातील मंदिर भाविकांना खुले झाल्याने मार्कंडेय पर्वतावर रविवारी पूर्वसंध्येलाच गुजरातसह धुळे, नगर, नाशिक, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील शेकडो भाविक दाखल झाले होते.

गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण व रविवारच्या पावसामुळे पर्वतावर अधुनमधून येणारे धुके यामुळे पर्वतावरील निसर्गसौर्द्य खुलून गेले होते. सोमवारी पहाटेपासूनच भाविक पर्वताच्या पायथ्याशी मुळाणे बारीत खाजगी वाहने व दुचाकींनी दाखल झाल्याने पर्वतावर भाविकांची गर्दी होऊ लागली होती.

पहाटे मार्कंडेय ऋषीच्या मूर्तीवर अभिषेक महापूजा झाली. सकाळी नऊपासूनच पर्वताच्या शिखरावरील मार्कंडेय ऋषी मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. दरम्यान, पर्वताच्या शिखरावरील दक्षिणमुखी मंदिरात पद्यासनाधिष्ट असलेल्या तेजोमय आश्वासक मार्केंडेय ऋषींच्या मुर्तीच्या दर्शनाने पर्वत चढून आलेल्या भाविकांना थकलेल्या चेहरा प्रफुल्लित होत, भक्तीभावाने दर्शन घेऊन भाविक पर्वत उतरत होते.

काही भाविक मार्केंडेय ऋषीच्या दर्शनानंतर पर्वत उतरून सप्तशृंगगडाकडे आदिशक्तीच्या दर्शनासाठी जात होते. पर्वताच्या पठारी व मंदिराकडे जाणार्या रस्त्यावर प्रसाद, पूजेच्या साहित्याबरोबरच पाणी बॉटल विक्रीची दुकाने ठिकठिकाणी थाटली होती. पर्वतावर मोठ्या प्रमाणावर भाविक पदयात्रेने, तर काही खाजगी वाहनांनी आल्यामुळे मुळाणे बारीच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यांवर एक किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या.

तसेच पर्वतावरही मुळाणे बारी, सप्तशृंगगड मार्ग, पिंप्री या तिन्ही बाजूंकडून भाविकांची पर्वत उतरणे व चढण्यासाठी रिघ लागली होती. कळवण पोलिसांनी पर्वताच्या पायथ्याशी व पर्वतावर चोख बंदोबस्त ठेवला होता.