धोकादायक जलकुंभामुळे कंधाणेकर चिंतीत

स्लॅब कोसळत असल्याने अनेक ठिकाणी भगदाड; नवीन जलकुंभाची मागणी
धोकादायक जलकुंभामुळे कंधाणेकर चिंतीत

डांगसौंदाणे । नीलेश गौतम Dangsoundane

कंधाणे (ता. बागलाण) ( Kandhane ) गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी 1972 साली बांधण्यात आलेला जलकुंभ ( Old Water Tank) जीर्ण झाला असून जुन्या झालेल्या बांधकामामुळे या जलकुंभाचा स्लॅब ठिकठिकाणी कोसळत आहे. जलकुंभाला बर्‍याच ठिकाणी भगदाड पडण्यास सुरुवात झाली असल्याने जलकुंभाची अनेक दिवसांपासून साफसफाई होऊ शकलेली नाही. त्यामुळे गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या जलकुंभाच्या ठिकाणी गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन जलकुंभ मंजूर करण्यात यावा यासाठी स्थानिक प्रशासनाकडून लोकप्रतिनिधी व सरकार दरबारी अनेक वेळा मागणी करण्यात आली आहे. परंतु संबंधितांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने कंधाणेवासीयांचा आरोग्यासह पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कंधाणे गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी आरम नदीच्या पाण्याचा वापर करावा लागत होता. वापरत असलेल्या अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांना अनेक साथीच्या रोगांना सामोरे जावे लागत होते. गावातील नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी तत्कालीन स्थानिक प्रशासनाने 1972 साली गावात पाणीपुरवठा योजना राबवून या जलकुंभाची निर्मिती केल्याने त्यातून संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करण्यात येत होता. आजमितीस निम्म्या गावाचा पाणीपुरवठा या जलकुंभाद्वारे करण्यात येत आहे.

बांधकामाला बर्‍याच वर्षांचा कालावधी लोटल्याने या जलकुंभाच्या वरच्या ठिकाणाचा स्लॅब बर्‍याच ठिकाणी कोसळून मोठमोठी भगदाडे पडली आहेत. या भगदाडातून अनेक पशुपक्ष्यी या पाण्यात पडत असून पाण्यातच सडत आहेत. वरचा भाग पूर्णत: धोकादायक बनल्याने या जलकुंभाची स्वच्छता करणे पाणीपुरवठा कर्मचारीवर्गाच्या जीवावर बेतू शकत असल्याने त्याने सदर जलकुंभाची अंतर्गत स्वच्छता करणे बर्‍याच महिन्यांपासून बंद केले आहे. जलकुंभाचे बांधकाम जुन्या राहटीचे असल्याने जलकुंभावर वरती चढण्यास कोणतीही सुविधा नसल्याने या टाकीच्या पाण्याच्या आत दडलंय काय? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.

जलकुंभाची स्वच्छता होत नसल्याने अनेक वेळा नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होतो. याबरोबरच जलकुंभाला बाहेरूनही अनेक ठिकाणी मोठमोठी भगदाडे पडत असून साठवलेल्या पाण्याला गळती लागली आहे. या जलकुंभ परिसरात नागरी वस्ती असून लहान बालके या ठिकाणी खेळत असतात. त्याचबरोबर जवळच प्राथमिक शाळा असल्याने बरेच विद्यार्थी या जलकुंभ परिसरातून जा-ये करत असतात. जलकुंभाच्या जीर्णत्वामुळे तो केव्हाही कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते.

या जलकुंभाच्या ठिकाणी नवीन जलकुंभ मंजूर करावा यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे अनेक वेळा आर्जव केले परंतु त्याची दखल घेतली गेलेली नाही. शासन-प्रशासन स्तरावरदेखील ग्रामस्थांनी पाठपुरावा केला, मात्र प्रश्न जैसे थेच आहे. नवीन जलकुंभाचा प्रश्न दरवेळेस लोकसभा व विधानसभा निवडणुकीत चर्चिला जातो. निवडणूक संपली का संबंधित लोकप्रतिनिधींना विसर पडतो. एखादी अघटित घटना घडण्याआधी नवीन जलकुंभ मंजूर होईल का? असा प्रश्न ग्रामस्थांतर्फे विचारला जात आहे.

नवीन जलकुंभाचा प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठवला असून सर्व परिस्थितीचे अवलोकनही संबंधितांना कथन केले गेले आहे. पण अद्याप कोणताही मंजूर आदेश आम्हाला प्राप्त नाही. जीर्ण बांधकामामुळे या जलकुंभाची अंतर्गत साफसफाई करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.

सतीश मोरे,ग्रामसेवक, कंधाणे

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com