नाशिक । Nashik

शहर तसेच जिल्ह्यात करोनाचा कहर सुरूच आहे. यासाठी लॉकडाऊन शिथिलता, नागरीकांचा निष्काळजीपणा यासह विविध कारणे आहेत.

परंतु यामध्ये आता शहरातील सिग्नलवरील भिकारी व विक्रेत्यांपासून करोना फैलावण्याचा धोका समोर आला आहे.

जिल्ह्यात करोना रूग्णांचा आकडा 66 हजार पेक्षा अधिक आहे. यामध्ये नाशिक शहरातील सर्वाधिक 46 हजार रूग्ण आहेत. शहरात लॉकडाऊन शिथिलता मिळताच निष्काळजीपणे नागरीक बाजारपेठांमधून फिरताना दिसत आहेत. याचा परिणाम करोनाचा प्रसार वाढण्यावर होत आहे.

याबरोबरच शहरातील सीबीएस, त्र्यंबकनाका, मुंबईनाका, सीटी सेंटर मॉल, शरणपुर सिग्नल अशा सर्व प्रमुख सिग्नलवर भिकारी बालके, वृद्ध, अपंग तसेच नवजात बालकांना पाठीशी बांधून अनेक महिला भिक मागताना दिसतात तर अनेक मुले व महिला खेळणी, गजरे, पेन, फुगे यासह विविध साहित्य विक्री करताना दिसत आहेत.

मात्र हे सर्वजन कमालीचे अस्वच्छ राहतात, नाका - तोंडाला अभावानेच मास्क दिसतो. ही सर्व मंडळी सिग्नल लागताच वाहने थांबलेल्या बाजुला चालकांसमोर येऊन पैशांची तसेच वस्तु घेण्याची विनवनी करतात, तर अनेकदा चालकाचे लक्ष नसल्याने चालकाच्या अंगाला स्पर्श करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जातो.

वाहन चालकांमध्ये अनेक करोना रूग्णही असण्याची शक्यता असते. यामुळे कोणतीही काळजी न घेणार्या या भिकारी मुले, वृद्ध तसेच विक्रेत्यांना करोनाचा संसर्ग होऊन ते करोनाचे वाहक ठरू शकतात. तर दुसर्या वाहन चालकास स्पर्श केल्यानंतर त्याच्याकडे ते करोनाचा प्रसार करू शकतात.

तसेच या भिकार्यांमध्ये अनेक सहा महिने ते 7 वर्षांच्या बालकांचा सामावेश आहे. यामुळे त्यांनाही करोनाचा धोका सर्वाधिक आहे. सिग्नलवर दया भावाने आपण भीक देत असतानाच करोना फैलावालाही निमंत्रण देत असल्याने याबाबत दक्षता घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. यामुळे सिग्नलवरील भिकारी व विक्रेत्यांना या ठिकाणांवरून हटवून त्यांची योग्य व्यवस्था शासनाने करावी अशी मागणी नागरीक करत आहेत.

भिकार्यांची योेग्य सोय लावा

शहरातील सिग्नलवरील भिकार्यांमुळे नागरीकांचे तसेच त्या भिकारी मुलांचेही आरोग्य धोक्यात आहे. त्यांना भिक मागण्यास भाग पाडणार्यांवर तात्काळ कारवाई होण्याची गरज आहे. याबाबत पोलीस, महापालिका व सबंधीत विभागांनी तातडीने पावले उचलावती.

- अक्षय अहिरे, मनसेना कार्यकर्ता

करोनाचा धोका टाळा

करोनाची सर्वत्र काळजी घेत असताना सिग्नलवर भिकार्यांच्या माध्यमातून सहज होणार्या फैलावाकडे मात्र सर्वांचे दुर्लक्ष आहे. भिकारी मुलांबद्दल दया वाटून जादा पैसे मिळावेत यासाठी मुद्दाम त्यांना अस्वच्छ ठेवले जाते. मास्क लावला जात नाही. याचा परिणामी वाहनचालकांना करोनाचा अधिक धोका संभवतो, प्रामुख्याने सीबीएस, त्र्यंबक नाका परिसरातून सातत्याने प्रवास करावा लागणारांना याचा अधिक त्रास आहे. याबाबत लवकर उपायोजना करण्यात याव्यात

- अॅड जयवंत वाटपाडे