नाशिक l Nashik

गेल्या आठवडाभरात जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून द्राक्ष उत्पादक व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भिती निर्माण झाली आहे.

त्यामुळे शेतकरी चिंतेत असून शनिवारी (दि. ९) खा. हेमंत गोडसे यांनी नाशिक तालुक्यातील सैय्यद पिंप्रीसह परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर जावून त्याना झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

जिल्हाभरात अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यात द्राक्ष बागांचे अतिप्रमाणात नुकसान झाले असून अर्ली द्राक्ष तोडणीवर आले असताना अशाप्रकारे नुकसान झाल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.

खा. गोडसे यांनी सैय्यद पिंप्री येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पाहणी केली आहे. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा खा. गोडसे यांच्यासमोर मांडल्या. विमा कंपनीकडून मिळणारा लाभ हा केवळ काही चुकीच्या धोरणामुळे अवघ्या दहा टक्के शेतकऱ्यांना मिळत आहे.

तो जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळावा, अशी शेतकऱ्यांनी मागणी केली असून यासाठी कृषीमंत्र्याकडे पत्राद्वारे तात्काळ खा. गोडसे पाठपुरावा केला आहे. तसेच द्राक्ष विमा कंपनीकडून १५ ऑक्टोबर नंतर तोडणी होणाऱ्या द्राक्ष उत्पादकांनाच विम्याच्या रकमेचा लाभ दिला जातो.

मात्र, १ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी द्राक्ष बागांची तोडणी करतात. त्यामुळे विमा कंपनीनी आपल्या धोरणात बदल करुन १ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान तोडणी करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील विम्याच्या रकमेचा द्यावा, अशी मागणी खा. गोडसे यांनी पत्राद्वारे कृषीमंत्र्यांकडे केली आहे.

या शिवाय विमा कंपनीने घालून दिलेल्या अटी व शर्तीमध्ये बदल करुन जवळपास सर्वच शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळावा, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी खा. गोडसे यांच्याकडे केली आहे.

या शिवाय बँकाकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी बँकांनी आपल्या धोरणात्मक बदल करुन कर्जाचे पुर्नरगठण करीत शेतकऱ्यांच्या हितावह काही निर्णय घेवून शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी खा. गोडसे यांनी पत्राद्वारे कृषीमंत्री यांच्याकडे केली.

या पाहणी दौऱ्या प्रसंंगी खा. गोडसे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी खा. गोडसे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

द्राक्ष उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांना विमा कंपनीकडून विमा रकमेचा लाभ मिळणे गरजेचे आहे. तसेच कर्जावरील व्याजासंदर्भात देखील पुर्नरगठण करुन शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्राकडे पाठपुरावा करुन द्राक्ष उत्पादकांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार.
खा. हेमंत गोडसे, नाशिक