पालखेड मिरचिचे l Palkhed Mirchiche (वार्ताहर)

नाशिक जिल्ह्यात गेल्या ४ दिवसापासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्ष व रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

निसर्गाच्या लहरीपणाशी दोन हात करत काबाडकष्ट करत लाखो रुपये खर्च करून हातातोंडाशी आलेला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी चिंतेत असून निफाडचे आ. दिलीप बनकर यांनी तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांच्या बांधावर जाऊन अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

जिल्हाभरात अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्याने रब्बी पिकासह द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये द्राक्ष बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. हवामानाचा अंदाज घेत सुरुवातीला द्राक्ष छाटणी करत द्राक्ष पिकाचे उत्पादन घेतले जाते परंतु निसर्गाच्या लहरीपणाचा फटका पुन्हा एकदा द्राक्ष पिकांना बसला.

निफाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादकांच्या द्राक्ष बागा अवकाळी पावसाने खराब झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झालेली आहे.

सदर नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करून त्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी याकरिता शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याची माहिती आमदार दिलीपराव बनकर यांनी दिली.