नाशिक । प्रतिनिधी Nashik

मागील एक आठवडयापासून शहर व जिल्ह्यात ढगाळ वातावरण व पावसाच्या सरी यामुळे गारठा पसरला आहे. त्याचा फटका द्राक्ष बागांना मोठया प्रमाणात बसला आहे.

कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा तालुक्यातील हंगामपूर्व द्राक्ष बागांना तडाखा बसला आहे. द्राक्ष घडात पाणी साचून तडे जाण्याचे प्रकार घडले. एकटया बागलाण तालुक्यात सुमारे 200 हेक्टरवरील द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे.

मागील वर्षी नैसर्गिक संकटाचा सामना केल्यानंतर याही वर्षी नुकसानीचा फटका द्राक्ष उत्पादकांना बसत आहे. शुक्रवार(दि.11)पासून जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरण असून अधूनमधून पावसाची रिमझिम होत आहे.

यामुळे तयार झालेल्या गारठ्यामुळे द्राक्ष उत्पादक संकटात सापडले आहेत. द्राक्षाबरोबरच काढणीला आलेला कांदा, डाळिंब बागांनाही या वातावरणाचा फटका बसला आहे. बदललेल्या वातावरणामुळे होणारे नुकसान रोखण्यासाठी फवारणीचा खर्च द्राक्ष व डाळिंब उत्पादकांना सोसावा लागत आहे. काही द्राक्षबागांचेघड पाणी उतरण्याच्या स्थितीत आहेत.

मात्र, वातावरण बदलामुळे या घडांना तडे जाण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाने सटाणा, देवळा परिसरातील द्राक्ष बागांचे नुकसान झाले. या भागात द्राक्ष काढणीचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. काढणीवर आलेली द्राक्षे अवकाळीच्या कचाटयात सापडली. द्राक्षांवर पाणी साचून घडांना तडे गेले. काही ठिकाणी कूज होण्याची धास्ती आहे.

बागलाणच्या तालुका कृषी अधिकर्यांच्या अहवालानुसार अवकाळी पावसामुळे 53 गावांतील 693 शेतकर्यांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. या एकाच तालुक्यात अंदाजे 200 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात पाच हेक्टरवरील शेवगा पिकाचे नुकसान झाले. निफाड, दिंडोरीसह अन्य भागातील द्राक्ष बागा फुलोरा प्रक्रियेतून पुढे गेल्या आहेत. त्यामुळे त्यांना पावसाची अद्याप झळ बसली नसल्याचे शेतकरी सांगतात.

बागलाण तालुक्यात पाऊस, थंड वातावरणामुळे काही बागांमध्ये द्राक्ष मण्यांना तडे गेले असून जवळपास 170 ते 200 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. उर्वरित भागातील द्राक्ष बागांचे अवकाळी पावसाने नुकसान झालेले नाही.

- संजीव पडवळ, जिल्हा कृषी अधिकारी