द्राक्षबागेचे नुकसान

पाण्याच्या टाकीत अज्ञात समाजकंटकाने टाकले तणनाशक
द्राक्षबागेचे नुकसान

चिंचखेड । वार्ताहर chinchkhed

चिंचखेड येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी संदीप बाळासाहेब मेधने यांनी केलेल्या दीड एकर क्षेत्रावर द्राक्ष बागेची लागवड केली आहे.

या बागेची गोडी बहार छाटणी झाल्यानंतर बागेसाठी फवारणीकामी लागणार्‍या पाण्यासाठी बांधलेल्या पाण्याच्या टाकीत अज्ञात समाजकंटकाने छेडछाड करून तणनाशक टाकल्याने द्राक्षबागेचे 5 लाखांवर नुकसान झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

संदीप मेधने हे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेतात. त्यांनी आपल्या बागेची 2 व 21 ऑक्टोबर अशा दोन टप्प्यात गोडी बहार छाटणी घेतली होती. या बागा पोंगा व दोडा अवस्थेत असताना नवीन घड व द्राक्ष वेलीची पाने जळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. नंतर त्यांनी टाकीतील पाणी व वेलीच्या काड्या तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविल्यानंतर त्यामध्ये 2 डाऊ हे तणनाशक टाकल्याचे परीक्षणात समोर आले आहे.

याबाबत नुकताच अहवाल मेधने यांना प्राप्त झाला आहे. त्यामुळे एखादया विकृताने खोडसाळ प्रकार केल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र कष्ट घेऊनही आता हंगामातील नियोजन कोलमडले आहे. या घटनेबाबत त्यांनी वणी पोलिसात तक्रार नोंदवली आहे. त्यामुळे पुन्हा छाटणी करून हाती काही आले तर खरे अन्यथा बाग तोडण्याची वेळ येऊ शकते असे संदीप मेधने यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com