
येवला : तालुक्यातील नागडे गावातील पैठणी कारागीर दाम्पत्य कमलेश बोंदार्डे व अश्विनी बोंदार्डे यांच्या घराची भिंत कोसळून हातमागाचे लाखों चे नुकसान झाले आहे. सदर घटना घडली तेव्हा विणकाम बंद असल्याने पुढील अनर्थ टळला.
करोनाच्या पार्श्वभूमीमुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे पैठणी कारागिरांकडून कोणताही व्यापारी पैठणी खरेदी करत नसल्याने त्याचा फटका पैठणी कारागिरांना बसला आहे. त्यातच आता या पैठणी कारागिराची घराची भिंत कोसळून हातमागाचे व त्यावर असलेल्या पैठणी साडीचे नुकसान झाले आहे.
दोन दिवसापूर्वी परिसरात पाऊस झाला. त्यानंतर या पैठणी कारागिराची घराची भिंत पैठणी हातमागावरच कोसळल्याने हातमागाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सर्वत्र लॉक डाउन असल्याने रोजगार बंद होता आता भिंत कोसळल्याने या दाम्पत्यावर उपासमारीची वेळ आली आहे.