वणव्यात आंबा रोपांचे नुकसान

600 रोपे जळून खाक
वणव्यात आंबा रोपांचे नुकसान

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

सिन्नर-बारागाव पिंपरीरोड ( Sinnar- Baragaon Pimpriroad )लगत असलेल्या डोंगराला आग लागून ( forest Fire )माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख यांच्या शेतातील 600 आंब्यांच्या रोपांसह ड्रीपचे पाईप जळून खाक झाल्याने त्यांचे लाखोंचे नुकसान झाले.

गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास बारागाव पिंपरीरोड लगतच्या डोंगरावर वणवा पेटला. जोरदार वारे वाहत असल्याने डोंगराचा पूर्ण परिसर आगीने व्यापला गेला. डोंगराच्या पायथ्याला गडाख यांचे शेत व फार्महाऊस आहे. या ठिकाणी त्यांनी जवळपास 500 ते 600 आंब्यांची झाडे ड्रीप सिंचनावर लावली आहेत. तसेच या ठिकाणी त्यांनी सुमारे एक कोटी लिटरचे शेततळेही बनवले आहे. डोंगराला लागलेल्या आगीत आंब्यांच्या झाडांसह ड्रीप पाईप, शेततळ्याचा प्लॅस्टिक कागद जळून खाक झाला. बघता-बघता आगीने रौद्र रूप धारण केल्याने डोंगरावरील कुरण व अनेक झाडांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

आगीची माहिती मिळताच गडाख यांच्यासह अ‍ॅड. योगेश गडाख, महेश हांडोरे, अभिषेक गडाख, बाळासाहेब गायकवाड, रवींद्र मोगल यांनी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने आग आटोक्यात आणण्यात ते अपयशी ठरले. नगरपरिषदेच्या अग्निशमन दलालाही तत्काळ पाचारण करण्यात आले होते. मात्र अग्निशमनचे वाहन डोंगरावर चढत नव्हते. तरीही त्यांनी शर्थीचेे प्रयत्न करत दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली.

तळीरामांवर कारवाई करा

बारागाव पिंपरीरोडलगत डोंगर व मोकळे मैदान असल्याने शहरातील अनेक तळीराम या ठिकाणी मद्य पिण्यासाठी येत असतात. अशाच मद्याच्या धुंदीत हे तळीराम परिसरातील गवताला पेटवून देत पोबारा करतात. मात्र सध्या उन्हाळ्यामुळे या परिसरात गवत वाळल्याने व हवेच्या वेगाने आग रौद्ररूप धारण करत असते. अशात हे तळीराम रिकाम्या मद्याच्या बाटल्या परिसरात फोडत असल्याने त्याचा त्रास येथील शेतकरीवर्गाला होत असतो. दररोज सकाळी अनेक नागरिक येथे फिरण्यासाठी येत असल्याने चालताना बाटल्यांच्या काचांमुळे अनेकांना इजा झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे या परिसरात येणार्‍या तळीरामांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी.

- अण्णासाहेब गडाख

Related Stories

No stories found.