खोदकामामुळे ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान

खोदकामामुळे ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सर्वाधिक डोंगरी गडकिल्ल्यांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या रामशेज (Ramshej Fort), हरिहर (Harihar Fort), पिसोळगड (Pisolgad Fort), इंद्राई (indrai Fort), हतगड (Hatgad Fort), वाघेरा (Waghera Fort) किल्ल्यावर उपद्रवी लोकांकडून होणाऱ्या खोद कामामुळे वीरांच्या समाध्या, सरदारांचे वाडे, सैनिकांचे जोते, राणीवसा या ऐतिहासिक वास्तूंचे (Historical Places) अतोनात नुकसान झाले आहे...

याबाबत वन विभागाचे (Forest Department) सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने कुठेतरी शेवटच्या घटका मोजणाऱ्या इतिहासाच्या पाऊलखुणा नष्ट करण्याचे प्रकार थांबवावे. तसेच किल्ल्यांच्या परिसरात होणारे खोदकाम, बांधकाम व खाणकाम कायमस्वरूपी बंद करावे.

अन्यथा दरड पडण्याच्या घटना व किल्ल्यांना बसणाऱ्या हादऱ्यांमुळे ऐतिहासिक वारसा धोक्यात येईल. याबाबतीत जिल्हाधिकाऱ्यांनी वन, केंद्रीय, राज्य पुरातत्व, जिल्हा प्रशासन दुर्गसंवर्धन संस्थांची एकत्रित बैठक लावावी, अशी मागणी निवेदनाद्वारे नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे (Suraj Mandhare) यांच्याकडे प्रत्यक्ष चर्चा करून शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ (Ram Khurdal) यांनी केली आहे.

छत्रपती शिवराय व त्यांच्या शूर मावळ्यांच्या शौर्य, पराक्रम व बलिदानाने पावन झालेले गडकोट या गडकिल्ल्यांच्या अस्तित्वासाठी दुर्गसंवर्धन संस्था राबत आहे. नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) ६० हून अधिक गडकिल्ल्यांच्या भूमीत गेल्या १५ वर्षे अविरतपणे राबणाऱ्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या वतीने नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना निवेदन देण्यात आले.

नाशिकच्या गडकिल्ल्यांवर धनांच्या लालसेपोटी काही स्वार्थी, लोभी उपद्रवी मंडळीकडून किल्ल्यांची अतोनात हेळसांड सुरू आहे. पिसोळंगड (बागलाण) येथील ३ समाद्यांची पूर्ण नासधूस केली आहे. रामशेजवर नावालाच उरलेल्या सरदाराच्या वाड्याला, सैनिकांच्या जोत्यांच्या मधोमध खोदून ठेवले आहे.

इंद्राई किल्ल्याच्या पायथ्याच्या मंदिरातील मूर्तीच गायब आहे. हातगडचा राणीवसा मधोमध खोल खोदून ठेवला आहे. हरीहर किल्ल्यावर दगडी मूर्त्या गायब आहेत तर वाघेरा (त्र्यंबक) किल्ल्याच्या आजूबाजूला वनसंपदेला लाकूड माफियांचा हैदोस आहे.

दरवर्षी सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वणवे लावल्याने जैवविविधता नष्ट होत आहे. याकडे ही वनविभागाने दुर्लक्षच केले आहे. नाशिकच्या गोदावरी पात्रात असलेल्या गोपिकाबाई पेशवे समाधी, तसेच बलकवडे बंधू समाधी स्थळाची जोपासना व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी यांनी या विषयावर संबंधित विभागला सूचना देऊन गडकोटांच्या भूमीतील ऐतिहासिक वास्तूंची हेळसांड थांबवावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

आम्ही गेली १५ वर्ष नाशिकच्या भूमीतील गडकिल्ले, बारवा, पुरातन समाध्या, वीरगळ यांच्या जतन संवर्धनासाठी राबतोय. समाज, सरकार, प्रशासन मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. आम्ही मोहिमेदरम्यान अभ्यासात्मक श्रमदान करत आहोत. मात्र जिल्ह्यातील असुरक्षित गडकिल्ल्यांचे रक्षण करणे वन, पुरातत्व व जिल्हा प्रशासनाची जबाबदारी आहे. किल्ल्यांच्या परिसरात खाणकाम, खोदकाम, लाकूडतोड, वणवे यामुळे इथे अतोनात नुकसान होत आहे. धानाच्या स्वार्थासाठी उपद्रवी किल्ल्यावरील वास्तूंची मोडतोड करतात हे दुर्दैव नाही तर काय? शिवरायांचे दुर्ग सांभाळणे जपणे हे सर्वांचे कर्तव्य मग दुर्लक्ष का होतेय?

- राम खुर्दळ, संस्थापक, शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com