नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

अवकाळी पाऊस व गारपिटीने जिल्ह्याला मोठा तडाखा दिला असून ८६ गावातील ५ हजार ७०२ हेक्टरवरील पिके व फळबागा आडव्या झाल्या आहेत.

तर, वीज पडून निफाडमध्ये एकाचा मृत्यू झाला असून पशूधनाचेही मोठे नूकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने युध्दपातळीवर प्राथमिक पंचनामे पूर्ण केले असून नुकसानीचा अहवाल शासनाला पाठवला आहे.

करोनामुळे अगोदरच शेतकरी संकटात आला असताना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका देखील सहन करावा लागत आहे. मागील एक आठवडयापासून राज्यातील अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून सोबतीला अवकाळी पाऊस व गारपिट होत आहे. नाशिक जिल्ह्यातही अवकाळीचा फटका बसला आहे.

अनेक तालुक्यांमध्ये अवकाळी पावसामुळे गहू,मका, बाजरी, ज्वारी, हरबरा व भाजीपाल्याला फटका बसला असुन शेतकर्यांच्या हाता तोंडांशी आलेला घास हिरावला गेला आहे. एकूण ५ हजार ३७७ हेक्टवरील पिके आडवी झाली आहेत. तर वार्षिक व बहुवार्षिक फळपिकांनाही अवकाळीचा तडाखा बसला आहे.

पपई, आंबा, डाळिंब व द्राक्ष बागांचे नूकसान झाल्याचे अहवालावरुन समोर आले आहे. जिल्ह्यात एकूण पाच हजार ७०२ हेक्टरवरिल पिके व फळबागांना अवकाळीचा फटका सहन करावा लागला आहे.

सर्वाधिक नूकसान झालेल्या तालुक्यांमध्ये निफाड, दिंडोरी, सटाणा व मालेगावचा समावेश आहे. दरम्यान या आस्मानी संकटामुळे शेतकरी संकटात सापडला असून शासनाच्या मदतीकडे त्यांचे लक्ष लागून आहे.