
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
हिवाळा सुरु असला तरी नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून थंडी गायब झाली आहे. आज दुपारी चार वाजेच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि शहरातील काही भागात रिमझिम पाऊस पडला तर काही भागात जोरदार पाऊस पडल्याने अनेक छोट्या-मोठ्या दुकानदारांचे नुकसान झाल्याचे दिसून आले...
नाशिकरोड, महात्मा गांधी रोड, नवीन नाशिक, पंचवटी गंगापूर रोड, कॉलेज रोड, सातपूर, अशोका मार्ग आदींसह अन्य काही भागात पाऊस पडला. तसेच त्र्यंबकेश्वर परिसरातदेखील पाऊस कोसळला आहे. गेल्या दोन दिवसांपासून वातारणात उष्णता जाणवत होती. बेमोसमी पावसामुळे वातावरण थंड झाले.
पंचवटी परिसरात औरंगाबाद रोडच्या बाजूला निलगिरी बागेजवळ भरणाऱ्या आठवडे बाजारमधील शेतकरी व भाजीपाला विक्रेत्यांची तारांबळ उडाली. भाजीपाला विक्रेत्यांची दुकाने ओली झाली असून भाजीपाला वाहून गेला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे लहान मोठ्या दुकानदरांचे प्रचंड हाल झाल्याचे चित्र आहे. बाजारात खरेदी करायला आलेले ग्राहकांचीदेखील मोठ्या प्रमाणात धावपळ उडाली.
दरम्यान, ढगाळ व पावसाच्या वातावरणामुळे द्राक्ष उत्पादकांमध्ये (Grape Growers) धडकी भरली आहे. प्रत्येक वर्षी अशा वातावरणमुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झालेले आहे. या वातावरणाचा उशिरा छाटणी झालेल्या द्राक्षबागा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली असून अशा ढगाळ व रिमझिम पावसामुळे घडकुज, मणीगळ तसेच डावणी व भुरी रोगाचा मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होत असतो. तर अनेक द्राक्ष बागा या रिमझिम पावसामुळे रोगग्रस्त होत असतात, यामुळे बळीराजा चिंताक्रांत झाला आहे.