अवकाळी पावसामुळे पीके भुईसपाट

अवकाळी पावसामुळे पीके भुईसपाट

निफाड। प्रतिनिधी | Niphad

तालुक्यातील रुई, डोंगरगाव, धानोरे, गाजरवाडी, सारोळे थडी, खेडलेझुंगे, धारणगाव वीर, धारणगाव खडक या गावांमध्ये झालेल्या वादळी वार्‍यासह (Stormy winds) जोरदार पावसामुळे (heavy rain) शेतातील उभी पीके (crop) आडवी पडून सडू लागली आहे. तर याच वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहे.

परिसरात मका (Maize), सोयाबीन (soybeans), द्राक्षबाग (vineyard), भाजीपाला (vegetables) आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने महसूल व कृषि विभागाने (Department of Revenue and Agriculture) तत्काळ या परिसराची पहाणी करून पीक नुकसानीचे पंचनामे (panchanama) करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाईसह विमा नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी शेतकर्‍यांनी (farmers) केली आहे.

यावर्षी शेतकर्‍यांनी मका, सोयाबीन, टोमॅटो, भाजीपाला यासह द्राक्षबागेसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला होता. त्यासाठी सोसायटी, बँका, पतसंस्था यांचेकडून कर्ज घेतले तर काही शेतकर्‍यांनी घरातील दागिने मोडून भांडवल उभे केले. तर ज्यांना हे शक्य नाही त्यांनी नातेवाईकांकडून हातऊसने पैसे घेऊन पीके उभी केली.

सध्या परिसरात मका पीक जोमदार आले असून ते थोड्याच दिवसात काढणीस येणार होते. सोयाबीन पिकाला (Soybean crops) देखील शेंगा लागल्या होत्या तर टोमॅटो पिकाची (tomato crop) खुडणी सुरू होती. भाजीपाला पीक देखील हातात आले होते. शेतकर्‍यांना दोन पैसे हातात येण्याची वेळ येत असतांनाच शनिवारी दुपारी जोरदार पावसाने (heavy rain) हजेरी लावली अन् शेतातील ही उभी पीके वादळी वार्‍यामुळे आडवी पडली. पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात शेतात साचल्याने आता ही पीके शेतातच सडू लागली आहे.

परिसरात मजूर वर्गाचे संकट कायम असतांना शेतकर्‍यांनी शेजारच्या तालुक्यातून मजूर आणुन या पिकांची मशागत केली. वेळोवेळी खते, औषधे व कीटकनाशकांची फवारणी करुन रोगांपासून पीके वाचविली. मात्र आता हातात आलेली पीके वाया गेल्याने या पिकांवर झालेला खर्च कसा वसूल करायचा आणि घेतलेले कर्ज कसे फेडायचे याचे उत्तर मिळत नाही. तसेच शेतात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे हातात आलेली पीके वाया गेली आहे. परिसरात अनेक शेतकर्‍यांनी महागडे कांदा बियाणे घेऊन रोपवाटिका तयार केल्या होत्या. मात्र पावसाच्या तडाख्यातून ही रोपे वाचू शकली नाही. त्यामुळे आता पुन्हा शेतकर्‍यांना नव्याने बियाणे घेऊन कांदा रोपे तयार करावी लागणार आहे. त्यातच आजचा बाजारभाव बघता कांदा लागवड परवडेनासी झाली आहे.

त्यामुळे शासनाने शेतमालांना उत्पादन खर्चावर आधारीत भाव द्यावा तसेच आत्ता झालेल्या पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून पीक नुकसानभरपाईसह विमा नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी लासलगाव खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन राजाराम मेमाने, संपत नागरे, संजय चांदे, बाळासाहेब गायकवाड, निवृत्ती चव्हाणके, सुधाकर रोटे, वाल्मीक ठोंबरे, ज्ञानेश्वर गायकवाड, संपत रोटे, संजय तासकर, बापूसाहेब तासकर, दिगंबर रोटे, मोतीराम मुदगुल, सुभाष रोटे, संजय दाते, अनिल दाते, सुभाष गायकवाड, लक्ष्मीकांत रोटे, रावसाहेब रोटे, संपत संभेराव, राजाराम मेमाणे यांचेसह शेतकर्‍यांनी केली आहे.

नुकसानीचे पंचनामे करावे देवगाव, धारणगाव, खेडलेझुंगे, डोंगरगाव, रुई, सारोळे थडी, कोळगाव या गावांमध्ये कार्यरत असलेले महसुली कर्मचारी हे कधीही या गावाकडे फिरकत नाहीत. महसूली कर्मचारी हे मुख्यालयी रहात नसल्याने त्यांना परिसरात काय घडते याचा अंदाज येत नाही. त्यामुळे त्यांनी आता शेतकर्‍यांच्या बांधावर जावून पीक नुकसानीची पहाणी करून वस्तुनिष्ठ अहवाल वरिष्ठांना द्यावा. अनेक महसूल कर्मचारी हे प्रत्यक्ष नुकसानीची पहाणी न करता बोगस पीक पहाणी अहवाल तयार करतात. त्यामुळे आत्ताच्या झालेल्या पीक नुकसानीची समक्ष पहाणी करून कृषि व महसूली कर्मचार्‍यांनी तत्काळ पंचनामे करून शेतकर्‍यांना न्याय द्यावा अन्यथा त्याबाबत परिसरातील शेतकर्‍यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

वाल्मीक ठोंबरे, शेतकरी (रूई)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com