अतिवृष्टीने पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांची मदतीची मागणी

अतिवृष्टीने पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांची मदतीची मागणी

पालखेड बं. । बापू चव्हाण

दिंडोरी तालुक्यात ( Dindori Taluka ) गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून तसेच पश्चिम पट्ट्यांमध्येही काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस ( Heavy Rain ) झाल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्‍यानी मदतीची मागणी केली आहे.

या पावसाने सध्या शेतामध्ये पाणी असल्याने तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे टोमॅटो या पिकाची तसेच सोयाबीन व इतर भाजीपाला यांचे नुकसान झाले आहे. होणार्‍या पावसामुळे पूर्व भागातील जनजीवनावरही विपरीत परिणाम झाला आहे. सध्या टोमॅटो काढणीचे काम चालू आहे, मात्र शेतात पाणी असल्याने शेतकर्‍यांची मोठी हाल होत आहे. या पावसामुळे झाडांचा पाला गळून फळांना तडा जात आहे. काळे डाग पडण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

दोन पैसे मिळतील या असे पोटी शेतकर्‍यांनी यावर्षी टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. मात्र निसर्गाच्या या लहरीपणामुळे हातात तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतलेला आहे. सध्या बाजारपेठेत टोमॅटोला बर्‍यापैकी भाव असल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले होते. परंतु या आनंदावरही पावसाने विरजण टाकले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मोटाकुटीला आला आहे. पावसामुळे द्राक्ष पंढरी म्हणून ओळख असणार्‍या पंढरीमध्ये अजूनही द्राक्ष छाटणीला सुरुवात करावी की नाही या विवांचनेत पडले आहे. दरवर्षी प्रमाणे होणार्‍या छाटणीलाही विलंब होताना दिसत आहे.

गेल्या काही वर्षांपासून काही ना काही आपत्ती येत असल्याने शेती व्यवसाय दिवसेंदिवस धोक्यात येतो की काय अशी भीती आता शेतकर्‍यांना वाटू लागली आहे त्यातच आर्थिक कोंडीही होत असल्याने शेती व्यवसाय करावा का नाही असा प्रश्न आता शेतकर्‍यांना भेडसावू लागला आहे. आता सर्व शेतकर्‍यांच्या आशा द्राक्ष पिकावर अवलंबून आहे. अजूनही हा पाऊस किती नुकसान करतो हे मात्र सांगणे कठीण आहे. पावसामुळे तालुक्यातील धरणांच्या साठ्यामध्येही वाढ झाल्याने धरणांमधून विसर्ग सोडला जात आहे याशिवाय तालुक्यातील महत्त्वाचा असणारा प्रश्न म्हणजे रस्ते हे रस्ते ही पावसामुळे खड्डामुळे झाले आहे. त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

शिवाय विजेचा प्रश्नही दिवसेंदिवस नागरिकांना भेडसावत आहे. तालुक्यात असे कितीतरी प्रश्न प्रलंबित असूनही याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने हा चर्चेचा विषय ठरत आहे. सध्या तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरू असल्याने सध्या निवडणुकीची रणधुमाळी पाहावयास मिळत आहे. मात्र शेतकर्‍यांच्या होत असलेल्या नुकसानीचे काय असा प्रश्न तालुक्यात चर्चिला जात आहे. तरी संबंधित खात्याने शेती पिकांचे पंचनामे करून आर्थिक मदत करून तालुक्यातील खराब झालेल्या रस्त्यांचे त्वरित काम सुरू करावे अशी मागणी तालुक्यातील जनता, शेतकरी, वाहनधारक, विद्यार्थी वर्ग करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com