गतवर्षीच्या तुलनेत धरणांत ३० टक्के जलसाठा कमी
नाशिक

गतवर्षीच्या तुलनेत धरणांत ३० टक्के जलसाठा कमी

सद्यस्थितीत ५८ टक्के पाणी : चार धरणे ओव्हर फ्लो

Kundan Rajput

नाशिक । प्रतिनिधी

मागील तीन दिवसांपासून शहर व जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर पहायला मिळत असून जिल्ह्यातील धरणसाठा हा ५८ टक्यांवर पोहचला आहे. गतवर्षी हे प्रमाण ८८ टक्के इतके होते. दारणा ९२ तर गंगापूर धरण ७६ टक्के भरले असून नाशिककरांवरील पाणी कपातीचे संकट तूर्तास तरी टळले आहे.

जूनच्या प्रारंभी जोरदार हजेरी लावणार्‍या पावसाने नंतर पाठ फिरवली. त्यानंतर जुलै महिना कोरडाठाक गेला. मान्सूनचे दोन महिने कोरडे गेल्याने नाशिककरांची चिंता वाढली होती. त्यामुळे उरली सुरली अपेक्षा ऑगस्ट महिन्याकडून होती. मुंबईसह कोकणात धुमाकूळ घालणार्‍या पावसाने नाशिक जिल्ह्यावरही आभाळमाया केली.

मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर समाधानकारक पावसाने हजेरी लावली आहे. महाराष्ट्राची चेरापुंजी समजल्या जाणार्‍या इगतपुरीत पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. परिणामी दारणा धरण ९२ टक्के भरले असून त्यातून रविवारी (दि.१६) नऊ हजार क्यूसेस वेगाने विसर्ग सुरु होता.

तर नाशिक शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या अंबोली घाटात पावसाचा जोर पहायला मिळत आहे. त्यामुळे गंगापूर धरणाच्या जलसाठयात वाढ होऊन तो ७६ टक्यांवर पोहचला आहे. जलसाठयात समाधानकारक वाढ झाल्याने नाशिककरांवरील पाणी कपातीची टांगती तलवार दूर झाली आहे. जिल्ह्यातील भावली, भोजापूर, हरणबारी व माणिकपुंज ही धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत.

दारणा व गोदा पात्रात पाण्याची पातळी वाढत असल्याने नांदूरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीकडे विसर्ग सुरु आहे.

धरणनिहाय पाणीसाठा (टक्के)

गंगापूर - ७६

कश्यपी - ३७

गौतमी गोदावरी - ४६

आळंदी - १८

पालखेड - ६६

करंजवण- ३४

वाघाड - ३३

अोझरखेड - ४२

पुणेगाव -१९

तिसगाव - ११

दारणा - ९२

भावली -१००

मुकणे - ५९

वालदेवी- ७१

कडवा - ८७

नांदूरमध्यमेश्वर - ७३

भोजापूर - १००

चणकापूर - ५८

हरणबारी - १००

केळझर - ३५

नागासाक्या - ८०

गिरणा - ४९

पुनद -५६

माणिकपुंज - १००

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com