दै.'देशदूत'आयोजित 'बागलाण दर्पण पुरस्कार सोहळा-२०२३' : विकासाची बीजे रोवणारा अधिकारी

दै.'देशदूत'आयोजित 'बागलाण दर्पण पुरस्कार सोहळा-२०२३' : विकासाची बीजे रोवणारा अधिकारी

बागलाणच्या ग्रामीण भागात कार्यक्षम ग्राम विकास अधिकारी म्हणून सर्व तालुक्याला परिचित असलेले ग्रामविकासाचे गाढे अभ्यासक ग्रामविकास अधिकारी केशवराव इंगळे ( Village Development Officer Keshavrao Ingle)यांचे ग्रामीण भागातील ग्रामविकासाचे कार्य उल्लेखनीय आहे.

ज्या ग्रामपंचायतीचा कारभार आपल्या हाती घेतला त्या ग्रामपंचायतीचा व गावाचा चेहरा मोहरा बदलणारे व्यक्तिमत्त्व म्हणून नावलौकिक मिळवणारे ग्रामविकास अधिकारी केशवराव इंगळे यांनी अनेक गावे ग्रामविकासातून समृद्ध केल्याचे दिसून येते. तालुक्यातील किकवारी, चाफ्याचे पाडे(देवपूर)हे आदिवासी भागातील गावे त्यांनी थेट राज्याच्या नकाशावर नेऊन ठेवले आहेत. दोघेही गावे राज्यात ग्रामस्वच्छता अभियानात अव्वल स्थानी नेऊन लाखो रुपयांची पारितोषिके मिळवून देण्यात ग्राम विकास अधिकारी केशवरावांचा सिंहाचा वाटा आहे.

आदर्श ग्राम प्रणेते केदा काकुळते व चाफा पाडा येथील तत्कालीन सभापती रामदास बागुल यांच्या सहकार्याने दोघेही गावे राज्यात आदर्श ठरविण्यात ग्राम विकास अधिकारी केशवराव इंगळे यांना यश आले. राज्यात हगणदारी मुक्त गाव योजना नाव रूपात येत असताना तालुक्यातील अनेक गावे निर्मल ग्राम करण्याचा मानस त्यांनी केला त्यात ते यशस्वी झाले. आदिवासी भागातील चाफ्याचे पाडे सर्वप्रथम निर्मल ग्राम करत तत्कालीन राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते इंगळे यांना गौरवीण्यात आले.

नोकरीत असताना सहकारी ग्रामसेवक मित्रांसाठी एक सक्षम नेतृत्व म्हणून केशवरावांचे नेतृत्व पुढे आले. ग्रामसेवक संघटनेत मानाचे स्थान मिळून प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्यात आली. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे कौन्सिलर म्हणून तर बागलाण ग्रामसेवक संघटनेचे तब्बल 15 वर्षे अध्यक्ष तर जिल्हा ग्रामसेवक संघटनेवर उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी इंगळे यांना मिळाली. संघटनेला कायम विश्वासात घेऊन पुढे जाणारे नेतृत्व म्हणून जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटना त्यांच्याकडे एक सक्षम नेतृत्व म्हणून पाहते. तालुक्यातील खालप कपालेश्वर, दहिंदुले ,चाफा पाडे, निर्मल ग्राम करण्यासोबतच या भागातील 362 आदिवासी शेतकर्‍यांना शासनाच्या विविध योजनेतून विहीर मोटार चे प्रकरणे स्वखर्चाने करून देत या योजना आदिवासींच्या जीवनात समृद्ध करणार्‍या ठरल्या व अनेक आदिवासी कुटुंबांचे कोरोडवाहू शेती बागायती झाल्याचे समाधान केशवराव यांना आहे.

ब्राह्मणगाव, मुंजवाड या गावांना तंटामुक्ती मध्ये विभागात अव्वल स्थानी नेऊन सात लाखांचे बक्षीस त्यांनी मिळवून दिले. तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या लखमापूरला पाणी आडवा पाणी जिरवा उपक्रम हाती घेत तो पूर्णत्वास नेत गावाला जलसंधारणाचा पुरस्कार त्यांनी मिळवून दिला. नामपूर येथे कार्यरत असताना तालुक्यातील सक्षम अश्या मोठ्या ग्रामपालिकेचे सूत्रे सांभाळत असताना अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न मार्गी लावले आहेत. नामपुर ला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देत हरणबारी धरणातून नामपूरसाठी स्वतंत्र पाणी योजना सुरू केली आहे. खालप गाव स्वच्छता अभियानात अव्वल स्थानी नेताना संपूर्ण गाव गुलाबी गाव म्हणून जिल्ह्याला ओळख निर्माण करून दिली.

शासनाच्या विविध योजना अंमलात आणून त्या पूर्णत्वास नेणारे केशवराव इंगळे यांना ग्रामविकासाचा असलेला अभ्यास ग्रामविकासाचे कवाडे घडणारा आहे. त्यांच्या या कार्याबद्दल आजपर्यंत अनेक सामाजिक संघटनांनी त्यांना गौरविले. त्यामध्ये प्रामुख्याने प्रतिष्ठाचा समजला जाणारा गिरणा गौरव, साप्ताहिक नो प्रॉब्लेमतर्फे दिला जाणारा कसमादे गौरव, रोटरी क्लबचा आदर्श ग्रामविकास अधिकारी सन्मान, ग्रामविकास खात्यातर्फे आदर्श ग्रामविकास अधिकारी म्हणून तत्कालीन महसूल आयुक्त संजय चहांदे यांनी गौरविले आहे. नाशिक जिल्हा परिषदेने सलग दोन वेळेस आदर्श ग्राम विकास अधिकारी म्हणून त्यांना गौरविले आहे. जाईल तिथे सोने करणारे ग्रामविकास अधिकारी म्हणून तालुक्यातील जनतेला परिचित असलेले केशवराव इंगळे यांना 'देशदूत' परिवारातर्फे गौरविताना मोठा आनंद होत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com