दै.'देशदूत'आयोजित 'बागलाण दर्पण पुरस्कार सोहळा-२०२३' : आपलेसे करणारे व्यक्तिमत्व

दै.'देशदूत'आयोजित 'बागलाण दर्पण पुरस्कार सोहळा-२०२३' : आपलेसे करणारे व्यक्तिमत्व

आपल्या आयुष्यात कोण येईल हे वेळ ठरवते, आयुष्यात कोणी यावे हे मन ठरवते आणि आपल्या आयुष्यात कोणी राहावे हा आपला स्वभाव ठरवतो. याच उक्तीप्रमाणे आदिवासी भागाची उत्तम जाण व आदिवासी जनतेला आपल्या स्वभावाने आपलेसे करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून प्रशांत उल्हास आंबेकर (Prashant Ulhas Aambekar )हे ग्रामसेवक जनतेत प्रसिद्ध आहेत.

ग्रामपंचायतीला पंचायत राज व्यवस्थेत महत्त्वपूर्ण स्थान आहे. ग्रामीण जनतेशी प्रत्यक्ष संपर्क साधणारी ‘लोकशाही संस्था’ असे ग्रामपंचायतीचे स्वरूप असून तिला पंचायतराज संस्थेचा पायाभूत घटक मानले जाते. ग्रामपातळीवरील कामांचा विचार केल्यास सरपंचाबरोबर ग्रामसेवकही महत्त्वाची भूमिका बजावत असतो. ग्रामीण जनतेशी दैनंदिन व्यवहारात प्रत्यक्ष व कायमच संबंध येणारा ग्रामसेवकच असतो. ग्रामसेवकाने आपल्या कार्याद्वारे लोकांचा विश्वास संपादन केला तरच विकासकामांच्या अंमलबजावणीत लोकांचे सहकार्य मिळवणे त्याला सहज शक्य होते. अशाच पद्धतीने आंबेकरांचे कार्य आहे.

हाती घेतलेल्या कामाशी समर्पित असलेले आंबेकर गाव विकासाच्या कामांची उत्कृष्ट कार्यशैली व ग्रामीण भागातील जनतेच्या अडचणींचा शासन दरबारी योग्य पाठपुरावा करून त्या सोडवण्यात अग्रेसर आहेत. 2013 साली बागलाण तालुक्यातील वनोली-डोंगरेज येथे पहिल्यांदा ग्रामसेवकपदावर ते रुजू झाले. प्रशासकीय बदलीने 2015-16 मध्ये बागलाण तालुक्यातील आदिवासी भागातील बुंधाटे-मोरकुरे येथील ग्रामपंचायत येथे त्यांची बदली झाली. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी हे त्यांचे मूळ गाव असून त्यांनी वाणिज्य शाखेत पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

प्रशासकीय कामकाज करतानाच त्यांना समाजसेवेदेखील रुची आहे. करोना महामारीकाळात जनतेच्या आरोग्याची काळजी घेत ग्रामपंचायत प्रशासनाकडून मोलमजूरी करणार्‍या मजूरवर्गाला घरपोच किराणा, भाजीपाला व गरजेच्या वस्तू त्यांनी पुरवल्या. करोना रोखण्यासाठी आपल्या उत्कृष्ट कार्यशैलीने विविध उपाययोजना आखल्या व ग्रामस्थांच्या मदतीने आंबेकरांनी त्या पूर्णत्वास नेल्या. ग्रामस्थांमध्ये जनजागृती करून योग्य समन्वय साधत शासनाचे विविध पुरस्कार या गावांना मिळवून देत आदिवासी भागात या गावांची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली.

आपल्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वामुळे ग्रामपंचायत योजनांची सखोल माहिती जनतेपर्यंत पोहोचवून प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यात ते नेहमीच अग्रेसर असतात. आजपर्यंत त्यांनी जवळपास 120 जणांना घरकुलांचा लाभ मिळवून दिला आहे. विद्यमान आमदार व जिल्हा परिषद सदस्य, ग्रामस्थ यांच्यामध्ये योग्य समन्वय साधत बुंधाटे येथील ग्रामदैवत हनुमान महाराज मंदिराच्या भव्यदिव्य वास्तूच्या नूतनीकरणात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. बुंधाटे-मोरकुरे या गावांसाठी जिल्हा परिषदेत पाठपुरावा करून त्यांनी निधी उपलब्ध केला.

याच निधीतून समाजमंदिर, व्यायामशाळा, ग्रामपंचायत कार्यालय, सौरदीप, रस्ते काँक्रिटीकरण आदी कामे प्रगतिपथावर आहेत. बुंधाटे-मोरकुरे ही आदर्श गावे करण्याचे आंबेकरांचे स्वप्न आहे आणि ते लवकरात लवकर पूर्ण होईल यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. गावच्या विकासाचे ध्येय असणार्‍या प्रशांत आंबेकर यांनी आजतागायत केलेले कार्य आदर्शवत आहे. त्यांना भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com