दै.'देशदूत'आयोजित 'बागलाण दर्पण पुरस्कार सोहळा-२०२३' : दागिने घडवणारा अभियंता

दै.'देशदूत'आयोजित 'बागलाण दर्पण पुरस्कार सोहळा-२०२३' : दागिने घडवणारा अभियंता

अभियंता म्हणून शिक्षण झालेल्या व नंतरच्या काळात सुवर्णलंकार घडविण्यात आपली आगळीवेगळी ओळख निर्माण करणार्‍या सटाणा शहरातील प्रशांत दिगंबरशेठ जाधव ( Prashant Digambar Jadhav )यांना दैनिक 'देशदूत' व श्रीधरतात्या कोठावदे मित्रमंडळाच्या वतीने बागलाण दर्पण पुरस्काराने सन्मानित करताना विशेष आनंद होत आहे.

सटाणा शहरातील टिळकरोड येथील सराफ पेठेत एकाच वेळी तनिष्का गोल्ड अ‍ॅण्ड सिल्वर, देवेंद्र ज्वेलर्स व समृध्दी ज्वेलर्स या तीन प्रतिष्ठानांच्या माध्यमातून सराफ असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रशांत दिगंबरशेठ जाधव यांनी सुवर्णलंकार घडविण्यात यशस्वी परंपरा जोपासली आहे. स्वर्गीय दिगंबरशेठ जाधव व स्वर्गीय प्रभावती जाधव यांचे अपत्य असलेले प्रशांत जाधव यांच्यासह त्यांचे मोठे बंधू देवेंद्र व लहान बंधू मयूर या तीन भावंडांच्या एकजुटीत जाधव परिवाराचे यश सामावले आहे. दि.26 जानेवारी 1981 रोजी जन्म झालेल्या प्रशांत जाधव यांनी धुळे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात टोमोबाईल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा तसेच मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी प्राप्त करतांना महाविद्यालय तसेच विद्यापीठ स्तरावर टॉपर असल्याचा बहुमान प्राप्त केला आहे.

कॉलेजच्या जीवनात स्पोर्ट्स सेक्रेटरी असलेल्या प्रशांत जाधव यांनी 2001 या वर्षी क्रिकेट चॅम्पियनशिप प्राप्त केली आहे. जाधव परिवाराचे आधारस्तंभ स्वर्गीय दिगंबरशेठ जाधव यांनी आपल्या आयुष्यात सराफ व्यावसायाची सुरुवात मनी कारागीर म्हणून केली होती. परंतु मुलांनी आपल्या कार्य कर्तृत्वातून स्वतःला सिध्द करीत खर्‍या अर्थाने समृध्दी प्राप्त केली आहे. परमेश्वर आपल्या आयुष्यात काय करतो, तर आपण केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना साथ देतो. या प्रमाणे ‘प्रयत्नांती परमेश्वर’ ही उक्ती जाधव परिवाराने प्रत्यक्षात साकारली आहे. प्रशांत जाधव यांनी सराफ व्यावसायात जोपासलेल्या गुणवत्ता व पारदर्शकतेचया पार्श्वभूमीवर, त्यांना यापूर्वी नाशिक सराफ असोसिएशनतर्फे युवा उद्योजक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.जाधव परिवारातील तिन्ही बंधू उच्चविद्याविभूषित असून भगिनी सौ.भारती उमाकांत दंडगव्हाळ विवाहित असून पुणे येथे स्थित आहे.

विशेषत: वैद्यकीय क्षेत्रात कोल्हापूर येथे शिक्षण घेत असलेले जाधव यांचे भाचे सूर्या व अमेरिकेत कॉम्प्युटर इंजिनीअरिंगमध्ये उच्चशिक्षण घेत असलेली भाची मानसी यांच्या पाठीशी खंबीरपणे साथ देणार्‍या प्रशांत जाधव यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पैलू त्यांच्यातील व्यापक विचारशक्ती दर्शविते. जाधव परिवाराच्या वाटचालीत सौ.राजश्री, सौ.प्रियंका, सौ.रेणू या सर्व महिलांची खंबीर साथ आहे. कुटुंबातील ओम, समृध्दी, तनिष्का,रणवीर, आराध्या, आरोही या सर्व मुलांची यशस्वी शैक्षणिक वाटचाल सुरू आहे. सराफ व्यवसाय करतांना जाधव यांनी पारंपरिकतेसोबत आधुनिकतेची जोड दिली आहे .कुठल्याही कलेच्या क्षेत्रात भारत देश जगाच्या पाठीवर प्राचीन काळापासून अग्रेसर राहिला असून, प्रामुख्याने सुवर्णलंकार घडविताना कलाकुसरीचे सूक्ष्म नक्षीकाम करावे लागते. दागिन्यांचे स्त्रियांना विशेष आकर्षण असले तरी, पुरुष देखील स्वत:ला साजेसे अंगठी,लॉकेट,चेन, कडे अथवा इतर अलंकार घडविण्यात रुची घेत आहेत.

या पार्श्वभूमीवर सटाणा शहरासह तालुक्यात शाखा विस्ताराचा जाधव यांचा मानस आहे. कलेच्या जोपासने सोबत प्रशांत जाधव यांच्या अभियांत्रिकी शिक्षणामुळे कुठलेही काम तंत्रशुद्ध पद्धतीने करण्याच्या सवयीमुळे वेळ व वस्तूंचा अपव्यय होत नाही .अलंकारांचे प्रोडक्शन व डिस्ट्रीब्यूशन एकाच ठिकाणी होत असल्यामुळे जाधव यांच्या प्रतिष्ठानमध्ये कॉर्पोरेट स्वरुप निर्माण झाले आहे. आयएसओ मानांकनाच्या धर्तीवर व्यवसायाची गुणवत्ता जोपासत असल्याचे जाधव यांनी सांगितले. सराफ व्यवसायासाठी वडिलांनी केलेला संघर्ष आम्ही भावंडांनी अनुभवला असून, त्यांच्याच प्रेरणेने व्यवसायात सक्रिय झाल्याचे स्पष्ट करीत, जाधव यांनी प्रतिष्ठानमध्ये येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला ग्राहक म्हणून नव्हे, तर कुटुंबातील सदस्य म्हणून प्रतिसाद दिला जात असल्यामुळे असंख्य व्यक्तींशी कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आहेत.

‘हमारा काम हमारी पहचान’या धर्तीवर येणारी प्रत्येक व्यक्ती, आपापल्या वर्तुळात आमच्या कामाबद्दल प्रतिक्रिया देत असते यामुळे जाहिरात व जनसंपर्कासोबत सर्वांशी अतूट नाते तयार झाल्याचा आनंद सुखावणारा आहे. सराफ व्यावसायिक कुटुंबियांनी आपल्या अपत्यांचे इतर क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी त्यांना आधुनिक शिक्षण निश्चित द्यावे, परंतु त्याचसोबत सुवर्णालंकार घडविण्याची कला देखील त्याना शिकविणे आवश्यक आहे. पूर्वी प्रामुख्याने ग्रामीण भागात बलुतेदारी पद्धत होती स्वयंपूर्ण खेड्याच्या संकल्पनेत सर्व जाती धर्मातील घटकांचे परस्परांना सहकार्य होते . काळाच्या ओघात तंत्रज्ञानाने सुधारणा होत असल्यामुळे कला जोपासण्यात मात्र उदासीनता असल्याचे निदर्शनास येते. कुठल्याही कामात कलात्मक दृष्टिकोन असेल तर अशा प्रकारची निर्मिती लक्षवेधी ठरते. सराफ व्यावसायिकांचे बहुतांश काम एका ठिकाणी बसून करण्याचे असल्यामुळे, शारीरिक व्यायामाची देखील आवश्यकता असते. आरोग्याची जोपासना केली, तर आयुष्याचा आनंद घेता येईल,असे मत जाधव यांनी व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com