दै.'देशदूत'आयोजित 'बागलाण दर्पण पुरस्कार सोहळा-२०२३' : कर्म हीच पूजा मानणारा राका परिवार

दै.'देशदूत'आयोजित 'बागलाण दर्पण पुरस्कार सोहळा-२०२३' : कर्म हीच पूजा मानणारा राका परिवार

‘लहरोसे डरकर नौका पार नही होती, कोशिश करनेवालोकी कभी हार नही होती’ महानायक अमिताभ बच्चन यांनी सादर केलेल्या प्रेरणादायी कवितेच्या प्रत्येक शब्दाचा आपल्या आयुष्यात अर्थ शोधून, प्रत्यक्षात यशस्वी वाटचाल निर्माण करण्यात नावलौकिक असलेल्या राका परिवाराचे प्रमोद राका ( Pramod Raka )यांना दैनिक ‘देशदूत’ व श्रीधरतात्या कोठावदे मित्रमंडळाच्या वतीने प्रदान करण्यात येणार्‍या पुरस्कारामुळे आनंद होत आहे.

सटाणा-मालेगाव रस्त्यालगत भव्य प्रांगणामध्ये राका परिवाराने राजेंद्र ट्रेडिंग कंपनी व शुभम ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून किराणा होलसेलमध्ये प्रामुख्याने सर्व प्रकारच्या डाळींमध्ये ट्रेडिंग व्यवसायातून विश्वासू व पारदर्शक परंपरा जोपासली आहे. स्व. साखरचंद राका व श्रीमती राजकुवरबाई यांचे अपत्य असलेल्या प्रमोद राका व राजेंद्र राका या दोघी भावांनी कौटुंबिक स्तरासह व्यावसायिकतेतदेखील परस्पर सहकार्यातून एकोप्याचे दर्शन घडवले आहे.

9 जून 1973 रोजी जन्म झालेल्या प्रमोद राका यांनी बी.कॉमपर्यंत शिक्षण पूर्ण करून 1990 साली स्थापन झालेल्या आपल्या व्यवसायाला चालना दिली. त्यांच्या या वाटचालीत राजेंद्र राका यांनीदेखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून मार्केटमध्ये आगळीवेगळी ओळख निर्माण केली आहे. राका परिवारातील विनिता किशोर कटारिया व संगीता सुनील जैन या भगिनी विवाहित असून नाशिक येथे स्थित आहेत. कुटुंबातील रूपाली प्रमोद राका व ममता राजेंद्र राका यांची खंबीर साथ असून युवा पिढीमध्ये शुभम, सौरभ, सिद्धार्थ, खुशबू, पूजा, खुशी ही सर्व मुले उच्चविद्याविभूषित आहेत. किराणा व ग्रोसरी होलसेलच्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणार्‍या राका यांच्या ट्रेडिंग कंपनीकडे नामांकित कंपन्यांची डिलरशिप आहे.

राका परिवाराचे आधारस्तंभ असलेल्या स्व. साखरचंद राका यांनी संपूर्ण कुटुंबाला प्रेरणा दिल्याचे स्पष्ट करत प्रमोद राका यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्यवसायाची आवड असल्यामुळे सक्रिय झाल्याचे सांगितले. प्रत्येक दिवशी आपल्या व्यवसायासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्यास समृद्धी निश्चित प्राप्त होते. यासाठी चिकाटीने आपल्या क्षेत्रात टिकून राहणे महत्त्वाचे आहे. उद्योग व्यवसायाला चालना देताना समाजातील अनेक घटकांना रोजगार उपलब्ध करून त्यांच्या कुटुंबाला आर्थिक शाश्वती देण्याचे काम उद्योजक-व्यावसायिकांतर्फे होते. आपण प्रत्येकाने आपल्याला दिवसभरात मिळालेल्या वेळेचा अपव्यय टाळणे आवश्यक आहे.

उद्योग-व्यवसायवाढीसाठी कौशल्याधिष्टीत मनुष्यबळ सहज उपलब्ध होत नाही. कामगार-कर्मचार्‍यांना प्रशिक्षित करत व्यवसाय पुढे न्यावा लागतो, अशी प्रतिक्रिया देत प्रमोद राका यांनी स्थानिक पातळीवर रोजगाराचे कौशल्य निर्माण करणारे शिक्षण आवश्यक असल्याचे सांगितले. महाराष्ट्र शासनानेदेखील वीज, पाणी, जागा, कामगार यांच्याबाबत किचकट कायद्यांना फाटा देत गुजरातच्या धर्तीवर उद्योग-व्यवसायांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे राका यांनी सांगितले.

राज्य व देशपातळीसह परदेशात अन्नघटकांचा पुरवठा करण्यात मोठ्या प्रमाणात संधी आहे. मागणी व पुरवठ्याचे सूत्र लक्षात घेऊन, कृषिप्रधान असलेल्या आपल्या देशात शहरासह ग्रामीण भागात शेतामध्ये पिकणार्‍या कडधान्य व इतर पिकांवर प्रक्रिया उद्योगांना चालना मिळाल्यास शेतकरी बांधवांना पाठबळ मिळण्यासह स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण होईल. व्यवसाय कुठलाही असो, आपल्याकडे असलेल्या वस्तूचा दर्जा टिकवण्यासाठी ‘फर्स्ट इन फर्स्ट आऊट’ अशा स्वरुपाचे प्रयत्न करावे लागतात.

साठवणुकीत महत्त्वपूर्ण भूमिका असणार्‍या गोदामाची जागा नीटनेटकी व उत्तम असणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत ट्रेडिंगचा व्यवसाय असला तरी भविष्यात मॅन्युफॅक्चरिंगकडे जाण्याचा मानस असून अशा पद्धतीच्या उद्योग समूहाची निर्मिती करणार असल्याचे स्पष्ट करत राका यांनी समाजातील छोट्या दुकानदारांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांच्याशी सातत्यपूर्ण व्यापार सुरू राहण्यासाठी वेळोवेळी मदत करण्याचे धोरण असल्याचे सांगितले.

आपल्या भारत देशाची प्रामुख्याने आर्थिक, औद्योगिक क्षेत्रात संपूर्ण जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचे स्पष्ट करत राका यांनी गेल्या काही वर्षांत भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्तम संबंध प्रस्थापित केले आहेत. फ्रान्सच्या मायकल नॉस्ट्राड्रम या तत्त्ववेत्याने सन 1955 यावर्षी घोषित केलेली एक दिवस भारत विश्वगुरू होईल ही भविष्यवाणी खरी होण्याचे संकेत प्राप्त होत आहेत. अशावेळी प्रत्येक क्षेत्रातील वाढता भ्रष्टाचार देशाच्या औद्योगिक प्रगतीत अडसर ठरत असून कॅशलेस ट्राझॅक्शनच्या माध्यमातून भ्रष्टाचार कमी होण्यास निश्चित मदत होईल, असा विश्वास व्यक्त करत राका यांनी उद्योग क्षेत्रात समाधानी असल्याचे सांगितले. विशेषतः नव्या पिढीला उद्योग जगतात आकर्षित, यासाठी प्रयत्नशील असल्याचे राका यांनी स्पष्ट केले.

सटाणा मर्चंटस् को-ऑप. बँकेचे यापूर्वी चेअरमनपद भूषवणार्‍या प्रमोद राका यांनी शहरातील जैन स्थानकाच्या माध्यमातून समाजिक बांधिलकी जोपासली आहे. राका यांचे बंधू राजेंद्र राका यांनीदेखील महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, सटाणा येथील जैन स्थानक, किराणा व्यापारी असोसिएशन अशा संस्था, संघटनांच्या माध्यमातून व्यापक जनसंपर्क निर्माण केला आहे. जीवनात कितीही अडचणी निर्माण झाल्या तरी सचोटीने व प्रमाणिकतेने काळानुसार प्रत्येक गोष्टीत आवश्यक बदल घडवणे आपण शक्य केले तर सर्व प्रश्नांचे उत्तर शोधता येते, असा विश्वास राका यांनी ‘देशदूत’शी बोलताना व्यक्त केला. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे या तत्त्वानुसार आपल्या प्रत्येक भेटीत माणूस जोडण्याची प्रक्रिया निरंतर जोपासणारा राका परिवार समाजासाठी दिशादर्शक आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com