दै.'देशदूत'आयोजित 'बागलाण दर्पण पुरस्कार सोहळा-२०२३' : शेती हाच श्वास!

दै.'देशदूत'आयोजित 'बागलाण दर्पण पुरस्कार सोहळा-२०२३' : शेती हाच श्वास!

माजी आमदार अहिरे या आजोबांचा वारसा पुढे नेत त्यांचे नातू युवा सामाजिक कार्यकर्ते नीलेश केदा चव्हाण ( Nilesh Keda Chavhan)यांनीदेखील राजकारणाबरोबर शेतीमध्ये आमूलाग्र बदल करत आदर्श शेतकरीचा बहुमान मिळवला आहे. त्यांना दैनिक ‘देशदूत’ व श्रीधरतात्या कोठावदे मित्रमंडळाच्या वतीने ‘बागलाण दर्पण पुरस्कार-2023'( Baglan Darpan Puraskar - 2023 ) प्रदान करताना विशेष आनंद होत आहे.

बागलाणचे पहिले आमदार सजन राघो अहिरे यांनी आमदारकीच्या कार्यकाळात बागलाण तालुक्यातील अनेक गावांचा विकास केला. तसेच अनेक समस्या मार्गी लागल्याने आज हा परिसर नंदनवन ठरला आहे. माजी आमदार अहिरे या आजोबांच्या वारसा पुढे नेत त्यांचे नातू बागलाण तालुक्यातील टेंभे येथील युवा सामाजिक कार्यकर्ते नीलेश केदा चव्हाण यांनीदेखील राजकारणाबरोबर शेतीमध्ये आमूलाग्र बदल करत आदर्श शेतकरीचा बहुमान मिळवला आहे. वडिलांनी पारंपरिक पद्धतीला आधुनिकतेची जोड देऊन तालुक्यातच नव्हे तर पंचक्रोशीत नावलौकिक संपादन केला आहे.

टेंभे येथील आदर्श शेतकरी स्व. केदा रामचंद्र चव्हाण व आई बेबीबाई केदा चव्हाण या दाम्पत्यास तीन मुले, एक मुलगी असा सुखी परिवार आहे. नीलेश चव्हाण यांचे प्राथमिक शिक्षण टेंभे येथील प्राथमिक शाळेत तर माध्यमिक शिक्षण नामपूर येथील शाळेत झाले. टेंभे जन्मभूमी असलेले विनोद चव्हाण हे सामाजिक कार्यामुळे तालुक्यात नावलौकिक मिळवून आहेत. टेंभे येथील राजे बहुउद्देशीय सामाजिक (शिवमुद्रा) संस्थेचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. या संस्थेमार्फत त्यांनी संपूर्ण गावात प्रत्येक घरासमोर वृक्ष लागवड, गरजूंना वेळेत रक्त मिळावे यासाठी त्यांनी अनेक वेळा रक्तदान शिबिराचे यशस्वीरीत्या आयोजन करून गाव आदर्श होण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

तसेच श्रमदानातून गावातील धरणांची निर्मिती केली आहे. तसेच चव्हाण यांनी टेंभे परिसरातील सुमारे 200 ते 300 शेतकर्‍यांना एकत्र घेत सह्याद्री बागलाण झोन फार्मर्स प्रोड्युसर कंपनीची स्थापना करून सह्याद्रीचे मार्गदर्शक विलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाद्वारे द्राक्षांचे नवनवीन वाण आरा-15 व 79 आदींचे विविध कंपन्यांच्या माध्यमातून शेतकर्‍यांना त्यांनी हे वाण उपलब्ध करून दिले. तसेच केळी, डाळिंब, संत्रा अशा पिकांवर समूह शेतीचा प्रयोगदेखील सुरू केला आहे. या कंपनीमार्फत शेतकर्‍यांना भेडसावणार्‍या विविध समस्यांबाबत येथे निराकरण केले जाते. त्यामुळेच अनेक शेतकर्‍यांना याचा फायदा झाला आहे. समाजातील गोरगरीब तसेच तळागाळातील जनतेची सेवा हीच ईश्वर सेवा असते या गुरू वचनांचे ते तंतोतंत पालन करत आजही सामाजिक कार्यात सदैव अग्रभागी असतात.

बागलाण तालुक्यात पहिली शिवजयंती साजरी करणारे टेंभे हे गाव असून ही शिवजयंती सुरू करण्यासाठी विनोद चव्हाण यांचा सिंहाचा वाटा आहे. तसेच गणेशोत्सव, नवरात्रोत्सव इत्यादी विविध कार्यक्रमांतदेखील चव्हाण यांचा सहभाग असतो. तरुणांनी व्यसनमुक्त राहावे, माता-पित्यांची सेवा करावी यास्तव त्यांचे जनप्रबोधनाचे कार्य सातत्याने सुरू असते. तरुण पिढी शेतीला नाक मुरडत असली तरी त्यांचा अनुभव वेगळा आहे. कष्ट करण्याची प्रामाणिकपणे जिद्द बाळगल्यास व पारंपरिक पद्धतीस आधुनिकतेची जोड दिल्यास शेती व्यवसायदेखील तुम्हाला प्रगतीच्या शिखरावर हमखास नेऊ शकतो हे त्यांनी स्वकर्तृत्वाने फुलवलेल्या शेती व्यवसायाद्वारे सिद्ध केले आहे. त्यांची शेती करण्याची आधुनिक पद्धत त्यामुळेच ते पंचक्रोशीतील शेतकर्‍यांना मार्गदर्शनाचा केंद्रबिंदू ठरले आहेत.

कमी पाण्यात पिकांचे योग्य नियोजन हा कानमंत्र चव्हाण यांनी प्रत्यक्षात अंमलात आणत ठिबक सिंचन व आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे टेंभे येथील माळरानावर शेतीचे नंदनवन फुलवले आहे. कृषी विभागाच्या सहाय्याने वेगवेगळी पिके घेत ते चांगल्यापैकी उत्पन्न मिळवत आहेत. नैसर्गिक संकटांचा सामनादेखील करावा लागतो परंतु त्याने न डगमगता पुन्हा उभारी घेत आहेत. जमिनीवर माळरान फुलणारे विनोद चव्हाण हे शेती हाच आपला श्वास असल्याचे अभिमानाने सांगतात.

सामाजिक कार्याची गोडी व कष्ट करण्याची प्रामाणिक इच्छा राहिल्यास अशक्य असे काहीच नाही. आपल्या यशामागचे कारण स्पष्ट करताना ते म्हणाले, शेती हाच आमच्या कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय आहे. वडील स्व. केदा चव्हाण यांचा आशीर्वाद मिळाला आहे. लहानपणीच वडिलांसमवेत शेतीत जाऊ लागलो त्यामुळे तिची गोडी निर्माण झाली. आज शेती हाच आपला श्वास ठरला आहे.

समाजकार्याची गोडी राहिल्यास सर्व अशक्य गोष्टी शक्य होतात याचा अनुभव आपण घेत आहोत. आधुनिक तंत्र साधनांचा व ज्ञानाचा शेतीसाठी उपयोग केला तर वेळ, पैसा व मनुष्यबळाची बचत होते. उदाहरणार्थ पिस्टन पंप, स्प्रे ब्लोअर ट्रेलर, रोटावेटर तसेच व्हेंचुरी ठिबक सिंचन आदी सर्व औजारे शेतकर्‍यांचे श्रम कमी ठरणारे ठरले आहेत. त्यामुळे या आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतकर्‍यांनी वापर केलाच पाहिजे.

कृषी विभागातर्फे यासंदर्भात सातत्याने माहिती दिली जाते. ही माहिती शेतकर्‍यांसाठी निश्चितच लाभदायी असून तिचा वापर प्रत्येक शेतकर्‍याने केला पाहिजे, असे आपले अनुभवाचे बोल असल्याचे विनोद चव्हाण यांनी सांगितले. पाण्याचे योग्य नियोजन, विजेचे वेळापत्रक लक्षात घेऊन आपण टेंभे परिसरात हिरवळ निर्माण केली तसेच शेतीमालाला चांगला भाव मिळाल्यामुळे आपल्या प्रगतीला हातभार लावणारे ठरले आहे.

निसर्गाचा लहरीपणा कुणालाही समजू शकत नाही. त्यामुळे बदलत्या परिस्थितीनुसार शेतकर्‍यांनी शेतीत परिवर्तन आणणे गरजेचे आहे. चव्हाण यांनी शेतीत आमूलाग्र बदल केल्यामुळे त्यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शेतकरी पुरस्कार तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते देण्यात येऊन त्यांना गौरवण्यात आलेे. तसेच त्यांच्या आई बेबीबाई केदा चव्हाण यांनादेखील महाराष्ट्र शासनाचा महिला शेतकरी पुरस्कार देण्यात आला आहे.

नीलेश चव्हाण यांना संत सावता माळी, छत्रपती पुरस्कारासह कसमादे गौरव आदी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या सामाजिक कार्यामुळेच टेंभे येथे त्यांच्या आई बेबीबाई केदा चव्हाण यांना जनतेने थेट लोकनियुक्त सरपंचपदासाठी भरघोस मतांनी मतदान करून त्यांना सरपंचपदी विराजमान केले आहे. शेतीबरोबरच त्यांनी ना नफा ना तोटा या तत्त्वावर गरजूंसाठी नर्सरी व्यवसायास काही वर्षांपासून सुरुवात केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com