
बुंधाटे नंतर आदिवासी लोकवस्तीच्या मोठे साकोडे येथील शाळेचे मुख्याध्यापक म्हणून मुसळे गुरुजींनी पदभार स्वीकारला. शाळेचा चेहरा मोहरा बदलत आदिवासी भागातील एक प्रगतीपथावरील जि. प. शाळा असा नावलौकिक मिळाला आहे. अतिशय खडतर परिस्थितीत स्वतःचे शिक्षण पूर्ण करून आदिवासी बांधवांच्या जीवनात गत 33 वर्षापासून शिक्षणाची बिजे रोवणारे मोठे साकोडे (Sakode )बागलाण येथील मुख्याध्यापक मुरलीधर मुसळे( Murlidhar Musale) यांच्या कार्यकर्तृत्वाला 'देशदूत' परिवारातर्फे शुभेच्छा!
मुळचे डांग सौंदाणे येथील मुरलीधर मुसळे यांनी 1988 मध्ये डीएड रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डा येथे करीत 1991 मध्ये नाशिक जिल्हा परिषद क्षेत्रात शिक्षकाची नोकरी स्वीकारली नोकरीची सुरुवात अतिदुर्गम असलेल्या सुरगाणा तालुक्यातील चिखली या आदिवासीबहुल भागातून करीत मुळात शिक्षणाच्या प्रवाहात नसलेल्या आदिवासींच्या मुलांना शिक्षणाच्या गंगोत्री मध्ये आणण्यासाठी कुठलीही भौतिक सुविधा नसताना मुरलीधर मुसळे यांनी घेतलेली मेहनत आणि त्यांच्या मेहनतीला आलेले फळ हे कौतुकास्पद आहे.
तब्बल 16 वर्षे या भागात नोकरी करीत आदिवासींच्या मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणणारे मुरलीधर मुसळे हे आदिवासी बांधवांसाठी खर्या अर्थाने गुरुवर्य ठरले आहेत अनेक कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्रसंगी स्वखर्चातून शैक्षणिक साहित्य पुरविणारे मुरलीधर मुसळे गुरुजी नी आपल्या 33 वर्षांच्या सेवेत अनेकांना उच्चशिक्षित केले तर अनेक कुटुंबांसाठी ते आधारवड ठरले आहेत 16 वर्षे सुरगाणा तालुक्यात नोकरी केल्यानंतर बागलाण तालुक्यात सन 2006 साली अतिशय दुर्लक्षित बुंधाटे शाळेचा कारभार मुख्याध्यापक म्हणून हाती घेतला.
शाळेत नोकरी निमित्त आलेल्या मुसळे गुरुजींच्या शाळेच्या पहिल्या दिवशी 4 विद्यार्थ्यांची हजेरी होती. 4 विद्यार्थ्यांना घेऊन शिक्षणाचे धडे देत शिक्षणाचा तिरस्कार वाटणार्या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाबद्दल आवड निर्माण व्हावी, त्यांनी रोज शाळेत यावे यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांना आवड निर्माण होईल असे शैक्षणिक उपक्रम हाती घेतले. या उपक्रमामुळे 4 विद्यार्थी संख्या असलेली शाळेची पटसंख्या 133 वर गेल्याचे मानसिक समाधान मुसळे गुरुजींच्या चेहर्यावर दिसते. तर बुंधाटे वासीय अशा शिक्षकाप्रती प्रेम आणि आदराचा भाव निर्माण करतात.
2016 मध्ये बुंधाटे नंतर या भागातील आदिवासी लोकवस्तीच्या मोठे साकोडे येथील शाळेचे मुख्याध्यापक म्हणून मुसळे गुरुजींनी पदभार स्वीकारला. शाळेचा चेहरा मोहरा बदलत आदिवासी भागातील एक प्रगतीपथावरील जि. प. शाळा असा नावलौकिक मिळाला आहे. 45 विद्यार्थी संख्या असलेल्या या शाळेत ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत असताना गावात सार्वजनिक वाचनालय व विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केंद्र त्यांनी सुरू केले. या भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना घडविणारे मुसळे गुरुजी यांना यापूर्वी लायन्स क्लब नाशिक, जनगणना कामात उत्कृष्ट कामकाज केल्यामुळे निवडणूक आयोगाने सन्मानित केले.
तालुक्याच्या शिक्षक संघटनेचे सरचिटणीस ते पदाधिकारी असा कार्यभार सांभाळणारे मुरलीधर मुसळे यांनी शिक्षण क्षेत्राबरोबर आपल्या तिघा भावंडांचे कुटुंब एकत्र ठेवीत एक आदर्श कुटुंब घडविले आहे कुटुंबातील तिघा भावांच्या मुलांना उच्च शिक्षणाचे धडे देऊन पुणे बेंगलोर सारख्या ठिकाणी नोकरीनिमित्त पाठविणारे मुरलीधर मुसळे या शिक्षण क्षेत्रातील सेवकाला 'देशदूत' तर्फे आयोजित 'बागलाण दर्पण पुरस्कार-२०२३' देताना मनस्वी आनंद होत आहे.