दै.'देशदूत'आयोजित 'बागलाण दर्पण पुरस्कार सोहळा-२०२३' : सामाजिक बांधीलकीचा वसा

दै.'देशदूत'आयोजित 'बागलाण दर्पण पुरस्कार सोहळा-२०२३' : सामाजिक बांधीलकीचा वसा

सामाजिक कार्याचा वसा घेत, अल्पावधीत सटाणा शहरासह तालुकावासीयांचे लक्ष वेधणार्‍या जयश्रीताई साहेबराव गरुड (Jayashree Sahebrao Garud ) यांना दैनिक 'देशदूत' व 'श्रीधरतात्या कोठावदे मित्रमंडळाच्या वतीने ’बागलाण दर्पण पुरस्कार -2023' प्रदान करताना विशेष आनंद होत आहे.

बारावी पर्यंत शिक्षण झालेल्या जयश्री ताईंना, मनिषा आहिरे, प्रतिभा जाधव, वर्षा बच्छाव या तीन बहिणी आहेत. मुंबई - बांद्रा येथे सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असलेले त्यांचे बंधू योगेश दादाजी सोनवणे व मविप्र संचलित सटाणा शहरातील मराठा हायस्कूलमध्ये अधीक्षक असलेले गरुड यांचे पती साहेबराव तुळशीराम गरुड यांच्या मार्गदर्शनातून त्यांची वाटचाल होत आहे. मुलांमध्ये गार्गी व यशराज हे देखील शिक्षणात अग्रेसर असून, विवाहापूर्वी वडिलांच्या अकाली निधनानंतर जयश्री गरुड यांनी कौटुंबिक जबाबदारी समर्थपणे निभावली आहे.

जयश्रीताईंच्या आई स्वर्गीय वसुंधरा सोनवणे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ नुकताच सटाणा शहरातील पाठक मैदानावर ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर, तसेच ह.भ.प. चैतन्य महाराज वाडेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या आध्यात्मिक पर्वणीत शहरवासीयांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी उपस्थित नागरिकांना ज्ञानेश्वरीचे वाटप करण्यात आले.

वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या माध्यमातून शासकीय तसेच इतर योजना गोरगरिबांपर्यंत पोहचविण्याचा प्रमुख उद्देश असल्याचे स्पष्ट करीत, फाउंडेशनकडे मदतीच्या आशेने आलेल्या सर्व घटकांना दिलासा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील कष्टकरी, शेतकरी, आदिवासी, दलित व इतर दुर्बल घटकांमध्ये आधुनिक काळात देखील मोठया प्रमाणात अज्ञान आहे. तळागाळातील अशा सर्व घटकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनचे सटाणा शहरातील कार्यालय सर्वांसाठी हक्काचे केंद्र असेल. फाउंडेशनच्या माध्यमातून कुठल्याही समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यात येईल. सामाजिक पातळीवर रक्तदान शिबिर तसेच इतर उपक्रम राबविण्यासह लहान बालक, युवक - युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक आदिंसाठी प्रामुख्याने आरोग्य सुविधा निर्माण करण्यासोबत, रोजगार निर्मितीच्या विविध पर्यायांचा शोध घेऊन, प्रत्येकाच्या आयुष्यात आर्थिक स्थिरता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गरुड यांनी सांगितले.

शहरातील नागरी सुविधांबाबत नगरपरिषदेमार्फत विविध विकासकामांमध्ये प्रामुख्याने नववसाहत परिसरात ठिकठिकाणी रस्ते, पथदीप, पाणीपुरवठा तसेच सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य आदी प्रश्नांबाबत नियमित उपाययोजना करीत असतांना, विशेषतः सांडपाणी निर्मूलनाबाबत सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. सद्यस्थितीत नववसाहतींच्या बहुतांशी खुल्या जागांवर कुंपण व सुशोभीकरण करण्यात येत असले तरी, रस्त्यालगत असलेले काटेरी झुडुपे नागरिकांसाठी अडथळा निर्माण करीत आहेत. अशा इतर समस्या सोडवण्यासाठी वसुंधरा फाउंडेशनतर्फे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार असल्याचे गरुड यांनी सांगितले. कौटुंबिक पातळीवर सर्व जबाबदार्‍या पार पाडण्यात महिलांची भूमिका महत्वपूर्ण असली तरी, त्याचसोबत महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी सक्षमीकरणाचे विविध उपक्रम राबविण्याची गरज आहे. यासाठी विविध कौशल्यांचे प्रशिक्षण आवश्यक आहे. वसुंधरा फाउंडेशनच्या माध्यमातून यासाठी शिबिरांचे आयोजन करणार असल्याचे गरुड यांनी सांगितले.

समाजातील आर्थिक दुर्बल घटकांतील कुटुंबांमध्ये एकीकडे चरितार्थ चालविण्यासाठी संघर्ष होत असतांना, लहान बालकांना शिक्षणापासून वंचित व्हावे लागत असल्यामुळे यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासण्याची गरज असल्याचे मत गरुड यांनी व्यक्त केले. लहान बालकांसह युवा पिढीचे जीवन घडविण्यात शिक्षणाचे महत्व असून, प्रत्येकावर माध्यम क्षेत्राचा देखील मोठ्या प्रमाणात प्रभाव आहे. यात सोशल मिडियाचा योग्य उपयोग करण्यातची गरज आहे. मोबाईल, कॉम्प्युटर, टेलिव्हिजनचे व्यापक अस्तित्व असले तरी वाचनातून निर्माण होणार्‍या वैचारिक परिपक्वतेला मात्र पर्याय नाही. शाळा महाविद्यालयातून नियमित शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी काही काळ वाचनालयांमध्ये व्यतीत करण्याची गरज आहे.

सटाणा नगरपरिषदेच्या महात्मा गांधी वाचनालयासह इतर काही वाचनालय कार्यान्वित असून, प्रत्येकाने नियमित किमान वर्तमानपत्र वाचनाची सवय जोपासण्याचे आवाहन करीत, गरुड यांनी बहुतांशी विद्यार्थी इंजिनिअरिंग - मेडिकलसारख्या शिक्षणात सहभागी असले तरी त्याचसोबत स्पर्धा पारिक्षांमध्ये करिअर घडविण्यासाठी सामान्य ज्ञान वाढविणारी पुस्तके उपलब्ध करण्यात वसुंधरा फाउंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया गरुड यांनी ’देशदूत’शी बोलतांना दिली. वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या उद्दिष्टांमध्ये समाजातील दुर्बल - वंचित घटकांसाठी समर्पित भावनेने कार्य करण्याचा प्रामाणिक हेतू असल्याचे स्पष्ट करीत, गरुड यांनी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या लोकाभिमुख कार्याचा आदर्श आपल्याला प्रेरणा देत असल्याचे गरुड यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com