दै.'देशदूत'आयोजित 'बागलाण दर्पण पुरस्कार सोहळा-२०२३' : वट वृक्षाची सावली- दगा दादाजी सोनवणे

दै.'देशदूत'आयोजित 'बागलाण दर्पण पुरस्कार सोहळा-२०२३' : वट वृक्षाची सावली- दगा दादाजी सोनवणे

आयुष्यातील कुठल्याही संकटाचा यशस्वी सामना करून, वयाच्या 85 व्या वर्षातसुद्धा तरुणांना हेवा वाटावा अशा उत्साहात कार्यरत असलेले सटाणा शहरातील प्रगतिशील शेतकरी दादा तथा दगा दादाजी सोनवणे (Progressive farmer- Daga Dadaji Sonavane )यांना ‘देशदूत’ व सटाणा शहरातील श्रीधरतात्या कोठावदे मित्रमंडळाच्या वतीने प्रदान करण्यात येणार्‍या ‘बागलाण दर्पण’ पुरस्काराने सन्मानित करताना विशेष आनंद होत आहे.

30 ऑक्टोबर 1938 रोजी जन्म झालेल्या दादांचे जुन्या काळात अकरावीपर्यंत शिक्षण झाले आहे. सटाणा शहरालगत नामपूररोड, मालेगावरोड, आराई बंधारा तसेच सटाणा-देवळारोड आदी परिसरात एकूण 32 एकर शेती क्षेत्रात उत्तम दर्जाच्या द्राक्ष, डाळिंबासारख्या पीक उत्पादनातून सोनवणे परिवाराने नावलौकिक निर्माण केला आहे. दादांच्या पत्नी राजसबाई यांची समर्थ साथ तसेच मुलगा चंद्रकांत व वसंतबापू यांच्यासह नातवंडांच्या सहकार्याने दादांनी समजात आपले आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहे.

1980 पासून 1994 पर्यंत या कालावधीत द्राक्ष व डाळिंबाचे उत्पादन करत असताना दादांच्या मार्गदर्शनातून सोनवणे कुटुंबाने बेदाणा निर्मितीत आपली वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण केली. मुलींमध्ये मीरा, रत्नमाला, कमल, शोभा, सुनीता यांचे विवाह झाले असून दादांनी आपल्या दूरदृष्टीतून उच्चविद्याविभूषित कुटुंबियांशी सोयरीक केली आहे. तसेच सर्व नातेसंबंधांमध्ये माणूसपणाची उत्तम बांधणी केली आहे. राजकारणापासून दूर असलेल्या दादांनी तालुक्यातील बागलाण ग्रेप ग्रोअर्स सोसायटीच्या माध्यमातून संस्थापक संचालकपदापासून आजपर्यंतच्या वाटचालीत शेतकरी हितासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. दादांनी निर्माण केलेल्या नर्सरीमधून महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान व कर्नाटक आदी राज्यांमधून डाळिंबाच्या रोपांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. डाळिंबाच्या रोपांचा पुरवठा करण्यासोबत उपरोक्त राज्यातील बहुतांशी शेतकर्‍यांना डाळिंबविषयक सल्ला व मार्गदर्शन करण्यात येते.

दादांच्या मार्गदर्शनातून डाळिंबाची शेती करणार्‍या गुजरातमधील लाखनी परिसरात असलेल्या गहनाभाई पटेल या दिव्यांग शेतकर्‍याने प्राप्त केलेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पटेल यांना पद्मश्रीने सन्मानित केले आहे. तसेच पटेल यांचा दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पटेल यांच्यासारख्या असंख्य शेतकर्‍यांच्या यशामध्ये दादांच्या मार्गदर्शनाचा सिंहाचा वाटा आहे. दादांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी काळाची पावले ओळखून शेतीसह निर्माण केलेल्या व्यावसायिक वाटचालीत गुणवत्ता जोपासण्यात कधीही तडजोड केली नाही. नेहमी विश्वासार्हतेला प्राधान्य दिले आहे. यामुळे सोनवणे कुटुंबियांनी प्रगतिशील शेतकरी म्हणून निर्माण केलेल्या आपल्या प्रतिमेसोबत शहरात प्रवेश करताना सटाणा-नाशिक रस्त्यालगत उभारलेल्या ‘राजस स्वीटस्’ या प्रतिष्ठानानेदेखील अल्प कालावधीत नावलौकिक प्राप्त केला आहे.

या माध्यमातून सक्षम पार्श्वभूमी असतानादेखील दादांनी मुलांसोबत नातवंडांना आत्मनिर्भर अस्तित्व निर्माण करण्याची प्रेरणा दिली आहे. निर्व्यसनी व सतत कार्यरत असलेल्या दादांना हृदयविकाराने ग्रासले. बायपास शस्त्रक्रिया केली असली तरी दादांनी वृद्धापकाळातील इतर आजारांवर विजय मिळवला आहे. करोना संसर्गाच्या काळात अत्यंत संवेदनशील स्थितीतून सावरताना प्रामुख्याने नातवंडांनी जीवाची पर्वा न करता दादांना साथ दिली. प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर करोनावर मात करणार्‍या दादांचा सटाणा शहरातील सिम्स हॉस्पिटलच्या वतीने करोना योद्धा म्हणून गौरव करण्यात आला.

आधुनिक काळात बहुतांशी कुटुंबांमध्ये आर्थिक व्यवहार व स्वार्थापुढे रक्ताच्या नात्यांची ओळख जोपासली जात नसल्याचे विदारक चित्र निर्माण झाल्याची स्थिती आहे. अशावेळी कुटुंबाला आर्थिक समृद्धीकडे नेत असताना पुढच्या पिढीला संस्काराची शिदोरी देण्याचे काम दादांनी केले आहे. दादांसारखे व्यक्तिमत्त्व समाजामध्ये वटवृक्षासारखे असतात. दादांनी आपल्या आयुष्यात वैचारिकतेचा समृद्ध वारसा जोपासला आहे. आपल्या आध्यात्मिक विचारातून प्रत्येकाने आई- वडिलांची सेवा करण्याचे मत व्यक्त करताना जन्माला आल्यानंतर आपण प्रत्येकाने सुखदुःखाच्या वाटचालीत यशापयशाचा अनुभव घेत कुठल्याही परिस्थितीत जगण्याची प्रेरणा आवश्यक असल्याचे सांगितले.

आपल्या आयुष्यातील अहंकार व व्यक्तिगत स्वार्थापेक्षा कुटुंबातील सर्वांसाठी समर्पित भावना जोपासण्याचे आवाहन केले. आदरणीय दादांनी व्यक्तिगत भावनांपेक्षा कुटुंबाच्या सुख आणि आनंदाला प्राधान्य दिले. दादांनी प्रसंगी कठोर व ताठर स्वभावातून कुटुंबाला शिस्त निर्माण करण्यासोबत कुटुंबाच्या समृद्धीसोबत प्रेम व आपुलकीचे नंदनवन साकारले आहे. संपूर्ण कुटुंबानेदेखील त्यांच्या आत्मसन्मानाची जोपासना करत, ‘दादा’ कुटुंबासाठी आधारस्तंभ असल्याची प्रतिक्रिया ‘देशदूत’शी बोलताना दिली.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com