दै.'देशदूत'आयोजित 'बागलाण दर्पण पुरस्कार सोहळा -२०२३' : केदा भामरे यांचा अटकेपार झेंडा

दै.'देशदूत'आयोजित 'बागलाण दर्पण पुरस्कार सोहळा -२०२३' : केदा भामरे यांचा अटकेपार झेंडा

कृषी क्षेत्रात ( Agriculture Sector )अग्रेसर असलेल्या इस्त्राईल देशातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्वतःच्या शेकडो एकर द्राक्षबागेत सोनं पिकवून परदेशात बागलाणचा झेंडा लावणारे कृषी पंडित आदर्श शेतकरी केदा (बापू) दावल भामरे ( Keda Daval Bhamre )यांना ‘देशदूत’च्या वतीने बागलाण दर्पण पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. त्यानिमित्त कृषी क्षेत्रात त्यांनी केलेल्या प्रगतीचा घेतलेला आढावा.

नाशिक जिल्ह्याच्या बागलाण तालुक्यातील सटाणा शहरापासून अवघ्या 20 कि.मी. अंतरावर असलेले पिंगळवाडे हे एक लहानसे खेडेगाव. येथील कै. दावल काळू भामरे व त्यांच्या धर्मपत्नी कै. पार्वताबाई दावल भामरे यांच्या सर्वसामान्य कुटुंबात बापूंचा जन्म झाला. जुन्या मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न धावता त्यांनी वडिलोपार्जित शेती व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला आपल्या वडिलोपार्जित तीस एकर शेतीत भुईमूग, बाजरी, मठ, मूगसारखी कडधान्याची पिके घेतली.

1986 साली शेतात विहीर करून बागायती पिके घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला ऊस, कपाशी, कांदा, गहू, मका यांसारखी पीक घेतले. त्यानंतर त्यांनी द्राक्ष, डाळिंब ही नगदी पिके घेणे सुरू केले. आपल्या अंगी असलेली हुशारी, जिद्द व कष्ट करण्याची तयारी या त्रिसूत्रीचा अवलंब करत दिवसागणिक कृषी क्षेत्रातील आपल्या प्रगतीचा आलेख त्यांनी सातत्याने उंचावत ठेवला. नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्याला द्राक्ष पिकाची पंढरी म्हणून संबोधले जाते आणि म्हणूनच एसटी बसने निफाडला जाऊन बापूंनी द्राक्ष बागायतदार म्हणून ओळख असलेल्या कै. माधवराव खंडेराव मोरे यांची भेट घेऊन द्राक्ष पिकाच्या उत्पादनाबाबतची माहिती व तंत्रज्ञान जाणून घेतले.

एवढ्यावरच शांत न बसता 1997 साली ते इस्राईलला गेले. तेथील कृषी क्षेत्रातील आधुनिक पद्धतीचे तंत्रज्ञान, औषध फवारणी यंत्रसामुग्री, द्राक्ष पिकांची प्रतवारी जाणून घेण्याबरोबरच परदेशात द्राक्ष निर्यात करण्यासंदर्भातही सखोल माहिती घेतली. इस्राईलचा अभ्यास दौरा करून आल्यानंतर त्यांनी द्राक्ष, डाळिंब व सीताफळ या पिकांच्या उत्पादनात नेत्रदीपक अशी प्रगती केली. आज 80 एकर क्षेत्रात द्राक्ष, 20 एकर क्षेत्रात सीताफळ व काही क्षेत्रात डाळिंब ही पिके घेत आहेत. पूर्णतः आधुनिक पद्धतीचे तंत्रज्ञान वापरून निर्यातक्षम द्राक्ष व सीताफळ पिकाचे उत्पादन ते घेत आहेत.

एक एकर द्राक्षबाग उभी करण्यासाठी प्रारंभी सात लाख रुपये खर्च येतो. त्यानंतर औषध फवारणी, अंतरमशागत, डिपिंग, खते यांचा मोठ्या प्रमाणात खर्च येतो. त्यांनी बाहेरगावाहून पाईपलाईनने पाणी आणून शेततळेही केले आहे. लक्ष्मीबाई या केदा बापूंच्या धर्मपत्नी. त्यांच्या नावातच लक्ष्मी असल्याने लक्ष्मी आज त्यांच्याकडे घरी पाणी भरते आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गोकुळ व सचिन ही दोन मुले तर सारिका व सोनम या बापूंच्या सुना आहेत. याबरोबरच रेखा संदीप अहिरे (ब्राह्मणगाव) व सविता अरुण पाटील (मालेगाव) या दोन विवाहित मुली आहेत.

केदा बापूंनी कृषी क्षेत्रात केलेल्या उत्तुंग अशा प्रगतीत पत्नी, दोन्ही मुले व दोन्ही सुना यांची मेहनत, जिद्द व चिकाटी यांचा अंतर्भाव आहे. कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेण्यासाठी केदा बापूंनी इस्राईल, इजिप्त, चीन, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, दुबई आदी देशांचा दौरा केला आहे. फळबाग उत्पादनातील एक अग्रेसर आदर्श शेतकरी म्हणून त्यांची ओळख असून निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक म्हणून महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. तर गिरणा गौरव व जीवनगौरव पुरस्कारही त्यांना देण्यात आला आहे. गावातील लोकांच्या आग्रहास्तव आणि समाजाचे आपण काही देणे लागतो ही भावना मनात ठेवून पिंगळवाडे ग्रामपंचायतीचे दोन वर्षे सरपंचपद त्यांनी भूषवलेले आहे. परंतु शेती हाच त्यांचा पिंड असल्याने कुणालाही न सांगता त्यांनी आपल्या सरपंचपदाचा राजीनामा देऊन राजकारणातून कायमचे अलिप्त झाले आहेत.

मात्र गावातील ज्येष्ठ मंडळींनी पुन्हा आग्रह धरल्यामुळे त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांनी गेल्या वर्षी सरपंचपदाच्या निवडणुकीत सहभाग घेतला व प्रचंड मताधिक्क्याने त्या सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत. सरपंचपदाच्या कालावधीत आजपावेतो त्यांनी कोट्यवधी रुपयांची विकासकामे केलेली आहेत. त्यात प्रामुख्याने 1 कोटी 25 लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना, जलसिंचनासाठी केटीवेअर बंधारा, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण, शिंदे वस्तीसाठी पाणीपुरवठा योजना यांचा समावेश आहे. केदा यांनी कृषी क्षेत्रात केलेली प्रगती व त्यांच्या पत्नीने आपल्या गावासाठी केलेली विकासकामे ही निश्चितच गौरवास्पद आहेत. केदा बापूंच्या कृषी क्षेत्रातील भरीव अशा प्रगतीची दखल घेऊन त्यांना दै. ‘देशदूतर्फे’ बागलाण दर्पण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत असल्याने त्यांच्या कुटुंबियांमध्ये व पिंगळवाडे गावात नवचैतन्य निर्माण झाले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com