
समाजातील युवक-युवतींमध्ये पारंपरिक शिक्षणासोबत राष्ट्रभावना निर्माण करुन शिस्त व संस्कारांच्या बळावर प्रत्येक पिढीला दिशा देण्याचे अतुलनीय कार्य करणारे बागलाण अकॅडमीचे अध्यक्ष आनंदा महाले (Aananda Mahale ) यांना दैनिक 'देशदूत' व श्रीधरतात्या कोठावदे मित्रमंडळाच्या वतीने ’बागलाण दर्पण पुरस्कार-2023' प्रदान करतांना विशेष आनंद होत आहे.
माजी सैनिक असलेल्या आनंदा महाले यांनी भारतीय सैन्यदलातील आपल्या सेवा काळात पाकिस्तान, बांगलादेश, चीन, भूतान, अफगाणिस्तान आदी देशांच्या सीमांवर तसेच देशातंर्गत अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, आसाम, पंजाब, राजस्थान या राज्यात कर्तव्य बजावण्यासाठी सहभाग घेतला. सैन्यदलात असतांना कमांडो कोर्स, पिटी कोर्स, बॅटल फील्ड नर्सिंग असिस्टंट,आदी प्रशिक्षण महाले यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले. भारतभूमीच्या संरक्षणासाठी सीमावर्ती भागात पाकिस्तान व आसाममधील नक्षलवादी परिसरात असलेल्या उल्फा, बोडो आदी अतिरेकी संघटनांशी संघर्ष करीत रात्रंदिवस लढा देऊन त्यांना कंठस्नान घालत त्यांच्यावर विजय मिळवला आहे.
निवृत्तीनंतर शहरापासून जवळ सटाणा - नामपूर रस्त्यालगत पोलीस - सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण एवं मार्गदर्शन संस्था बागलाण शैक्षणिक, सामाजिक, कला व क्रीडा मंडळ संचलित बागलाण अकॅडमीची स्थापना करुन महाले यांनी प्रामुख्याने ग्रामीण भागातील युवक युवतींना आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, सीआरपीएफ, सीआयएसएफ, बीएसएफ, आयटीबीपी, एसएसबी, आसाम रायफल, बँक, रेल्वे, क्लार्क, तलाठी, महाराष्ट पोलीस वनविभाग तसेच एमपीएससी - यूपीएससी आदी स्पर्धा परीक्षांसाठी केलेल्या मार्गदर्शनात गुणवत्ता जोपासली. सैन्यदलासह सुरक्षादलात सहभागी होण्यासाठी बागलाण अकॅडमीत असलेल्या प्रशिक्षणार्थीच्या भोजनासह इतर नियोजनात महाले यांच्या पत्नी सौ. सुनीता महाले तसेच मुले राहुल व प्रशांत दिवसरात्र परिश्रम घेत आहेत.
बागलाण अकॅडमी या संस्थेला मुंबई येथील महासमादेशक होमगार्ड यांच्यामार्फत सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण देणे व सुरक्षारक्षक पुरविण्याची परवानगी प्राप्त झाली आहे. तालुक्यासह कसमादे परिसरात बागलाण अकॅडमीचे प्रशिक्षणार्थी विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन पोलीस यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून समाजातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे कार्य करतात. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून बागलाण अकॅडमीत प्रशिक्षणासाठी सहभागी यवक - युवतींना करिअरची दिशा निश्चित स्वरुपात प्राप्त होत असल्याचा विश्वास व्यक्त करीत आनंदा महाले यांनी, नियमित शैक्षणिक अभ्यासक्रम व शारीरिक व्यायामासोबत विविध वक्त्यांची प्रेरणादायी व्याख्यानांचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले.
तरुण पिढीने व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन करीत महाले यांनी, विद्यार्थ्यांना नियमित वाचन व व्यायाम केल्यास प्रत्येकाच्या आयुष्याला योग्य आकार निर्माण होत असल्याचे सांगितले. राज्याच्या प्रत्येक जिल्हयाला अकॅडमीची शाखा निर्माण करण्याचा आपला मानस असून यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्ह्यात सैन्यभरतीसाठी पूर्व प्रशिक्षण घेता येईल व प्रशिक्षक म्हणून माजी सैनिकांचे देखील पुनर्वसन होईल, अशा पध्दतीने वाटचाल करण्यात येत असल्याचे महाले यांनी सांगितले. एकीकडे समाजात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर होत असतांना, प्रशिक्षणार्थीना शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम करुन त्यांच्यात आत्मविश्वास जगविण्याचे काम बागलाण अकॅडमीत होत आहे.
प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सहभागी विद्यार्थ्यांना शंभर टक्के नोकरीची हमी असल्याने बागलाण अकॅडमीचा नावलौकिक सर्वदूर पोहचला आहे. याठिकाणी अभ्यासासाठी वाचनालय, प्रशस्त मैदानावर मोकळया हवेत प्रशिक्षण व्यवस्था, व्यक्तिमत्त्व विकास व स्वावलंबी जीवनाचे मार्गदर्शन, हेल्थक्लब, वसतिगृह व सकस आहार, ड्रायव्हिंग स्कुल, कॉम्प्युटर ट्रेनिंग, लेखी परीक्षेची तयारी असे विविध उपक्रम राबविण्यात येतात. दारिद्रय रेषेखालील ग्रामीण भागातील मोफत प्रशिक्षणाची व्यवस्था व नोकरीची हमी दिली जाते.
तसेच कुठल्याही वयाचा व कुठलेही शिक्षण झालेल्या महिला - पुरुषांना देखील नोकरीची संधी उपलब्ध करण्यात येते. ग्रामीण भागातील बेरोजगार मुला - मुलींना कौशल्याभिमुख रोजगार मिळविण्यासाठी भारत सरकार व ग्रामीण विकास मंत्रालय द्वारा प्रायोजित दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत दहावी - बारावी पास, अठरा ते पस्तीस वयोगटातील प्रशिक्षणार्थीना सुमारे चार ते पाच महिन्यांच्या कालावधीत सी सी टी व्ही सुपरवायझर, सीक्यूरीटी सुपरवायझर, सीक्यूरीटी गार्ड आदी मोफत कोर्सेस बागलाण अकॅडमीमार्फत राबविण्यात येत आहेत.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांसह इतर सुविधांबाबत अधिक माहितीसाठी अकॅडमीच्या कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहन आनंदा महाले यांनी केले आहे. बागलाण अकॅडमीची वाटचाल देशाचे थोर स्वातंत्र्ययोद्धे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रेरणेने होत असून, परिसरात उभारण्यात आलेल्या नेताजींच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करुन प्रत्येक प्रशिक्षणार्थी आपल्या कार्याला प्रारंभ करीत असल्याचे आनंदा महाले यांनी सांगितले. युवा पिढीला योग्य दिशा दर्शविण्यासह आत्मसन्मानाने जीवन जगण्याची क्षमता निर्माण करुन आनंदा महाले यांनी खर्या अर्थाने सामाजिक बांधीलकी जोपासली आहे.