दै. देशदूत वृत्ताची दखल : गोदावरी नदीपात्रातील पानवेली काढण्यास प्रारंभ

जलसंधारण विभागाची धडक मोहीम
दै. देशदूत वृत्ताची दखल : गोदावरी नदीपात्रातील पानवेली काढण्यास प्रारंभ

निफाड । प्रतिनिधी

चाटोरी ते सायखेडा या एक किलोमीटर अंतरातील गोदावरी नदीपात्रातील पानवेली बोटीच्या सहाय्याने काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. जलसंपदा विभागाने पानवेली काढण्याची हाती घेतलेली ही मोहिम नांदूरमध्यमेश्वर धरणापर्यंत राबवावी अशी मागणीही गोदाकाठच्या शेतकर्‍यांनी केली आहे.

गेल्या अनेक वर्षापासून तालुक्यातून वाहणार्‍या गोदावरी नदीपात्राला पानवेलींचा विळखा पडल्याने परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. नदीपात्रातील हे पाणी दूषित झाल्याने जनावरे देखील पीत नव्हते. पानवेली व दूषित पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढल्याने गोदाकाठच्या गावांमध्ये साथीचे आजार वाढू लागले होते. नदीपात्रातील पानवेली काढण्याबाबत दै. देशदूतने दि.26 एप्रिल व त्यानंतर 5 जून रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते.

गोदाकाठच्या नागरिकांनीही त्याबाबत आवाज उठविला होता. या पानवेलींमुळे सायखेडा-करंजगाव पुलाला देखील धोका निर्माण झाला होता. तसेच नांदूरमध्यमेश्वर धरण परिसरात असणार्‍या पक्षी अभयारण्यात असणार्‍या शेतकरी व पर्यटकांना देखील या दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. परिणामी या पानवेली काढण्याबाबत गोदाकाठच्या नागरिकांनी शासनाकडे वेळोवेळी मागणी केली होती. दरवर्षीच पानवेलीचा प्रश्न गाजत असतांना शासनाकडून वरवरची मलमपट्टी केली जात होती. त्यामुळे आत्ताही जलसंपदा विभागाने पानवेली काढण्याची हाती घेतलेली मोहीम शेवटपर्यंत तडीस न्यावी अशी मागणी गोदाकाठ परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

दै. देशदूतच्या वृत्ताची दखल घेत जलसंपदा विभागाने सद्यस्थितीत सायखेडा ते चाटोरी या दरम्यानच्या पानवेली यांत्रिक बोटीच्या सहाय्याने काढण्यास सुरुवात केली असून चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापनचे 15 जणांचे पथक हे काम करीत आहे. गोदावरीतील या पानवेलीमुळे पुराचे पाणी पानवेलींना अडकून ते शेतात जात असल्याने शेतीपिकांचे दरवर्षीच मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे जलसंधारण विभागाच्या अधिकार्‍यांनी गोदावरी व दारणा नदीला पूर येण्यापूर्वीच पानवेली काढण्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.