मालेगाव । प्रतिनिधी Malegaon / Dabhadi / Patne

तालुक्यातील राजकीयदृष्ट्या जागृत मानले जाणार्या दाभाडी येथील प्रथम लोकनियुक्त सरपंच चारूशिला निकम यांच्याविरुद्ध 14 ग्रामपंचायत सदस्यांनी मंजूर केलेला अविश्वास ठराव पुन्हा मान्यतेसाठी जनतेच्या दरबारात पाठविण्यात आला आहे.

आज बुधवार दि. 25 रोजी होणार्या विशेष ग्रामसभेत या ठरावाच्या बाजुने व विरोधात मतदान घेतले जाणार आहे. या दृष्टिकोनातून प्रशासन यंत्रणेतर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे.

पाटणे ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचाविरुद्ध ग्रा.पं. सदस्यांनी मंजूर केलेला अविश्वास ठराव ग्रामस्थांनी फेटाळून लावला होता. त्यामुळे दाभाडीचे ग्रामस्थ काय निर्णय घेतात याबद्दल उत्कंठा वाढली आहे. दरम्यान, अविश्वास ठराव मंजुरीवरून आरोप-प्रत्यारोपांचा भडीमार सुरू झाल्याने राजकीय वातावरण अक्षरश: ढवळून निघाले आहे. चारूशिला निकम या अव्दय हिरे गटाच्या मानल्या जातात. त्यांच्याविरुद्ध सेनेचे सदस्य उभे ठाकले आहेत. त्यामुळे ही लढाई दोन्ही गटांनी अटीतटीची केली असून यशासाठी सर्वशक्ती पणास लावल्याने गावातील वातावरण अक्षरश: ढवळून निघाले आहे.

सेना-भाजप युती सरकारने थेट जनतेतून सरपंच निवडण्याचा कायदा केला.त्याच दरम्यानमध्ये दाभाडी ग्रामपालिकेची पंचवार्षिक निवडणूक झाली. सेना विरूद्ध भाजप असा अटीतटीचा सामना रंगला. यात अद्वय हिरे गटाच्या (भाजप) चारूशिला निकम यांनी सेनेच्या वनमाला प्रमोद निकम यांचा पराभव केला.

याच निवडणुकीत हिरे गटाचे 10 तर सेनेचे 7 उमेदवार निवडून आले. वर्ष दोन वर्ष कारभार सुरळीत सुरू असतांनाच सत्ताधारी गटाचे व विरोधक अशा 14 सदस्यांनी थेट सरपंच चारुशीला निकम यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्यात आला. 5 ऑक्टोंबर 2020 रोजी मतदान होऊन 14 विरूद्ध दोन मतांनी मंजूर झाला होता. नवीन नियमानुसार ग्रामसभेत या ठरावावर शिक्कामोर्तब होणे आवश्यक आहे. त्यामुळे आज सहा वॉर्डांतील सतरा मतदान केंद्रांवर मतदान होत आहे.

सकाळी सात ते दहा या वेळेत मतदार नावनोंदणी आणि 11 ते 2 या वेळेस नोंदणी झालेल्या मतदारांना मतदान करता येणार आहे. 17 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.अविश्वास ठरावाच्या बाजूने ‘वर्तुळ’ तर ठरावाच्या विरुद्ध ’त्रिकोण’ चिन्ह निश्चित करण्यात आले आहे. गुप्त मतदान प्रक्रियाद्वारे मतदान होणार आहे. मतदानाची प्रक्रिया संपताच मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात येणार आहे.

अविश्वास ठरावाच्या बाजुने व विरोधात राहण्यासाठी दोन्ही गटाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रत्येक मतदारास भेटीगाठी घेत साकडे घालण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या भडीमारामुळे राजकीय वातावरण अक्षरश: ढवळून निघाले आहे. हिरे गटाकडून दशरथ निकम, हिरामण गायकवाड, नितीन निकम, हेमराज भामरे, नीलेश बाविस्कर यांच्यासह पदाधिकारी तर ठरावाच्या बाजूने माजी जि.प. सदस्य अमृत निकम, भिकन निकम, अशोक निकम, सुभाष नहिरे, दिलीप निकम, डॉ. एस.के. पाटील, नीलकंंठ निकम, प्रमोद निकम, संजय निकम, जि.प. सदस्या संगीता निकम, पं.स. सदस्या कमळाबाई मोरे आदी रिंगणात उतरले आहेत.

गावात वर्चस्व ठेवून असलेले काही नेत्यांनी मात्र मौन बाळगले आहे. त्यामुळे हे नेते अखेरच्या क्षणी कुणाच्या पारड्यात आपले तुळशीपत्र टाकतात व कुणाचा हिशोब चुकता करतात याबद्दल उत्सुकता शिगेला पोहचली आहे.