दाभाडी : सरपंच अविश्वास ठरावास ग्रामस्थांची संमती

दाभाडी : सरपंच अविश्वास ठरावास ग्रामस्थांची संमती

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

भ्रष्टाचाराचे आरोप, चौकशी व संमत झालेल्या अविश्वास ठरावामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतलेल्या दाभाडीच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच चारुशीला अमोल निकम यांना ग्रा. पं. सदस्यापाठोपाठ विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनीदेखील नाकारल्याचे काल झालेल्या विशेष ग्रामसभेतील मतदानावरून स्पष्ट झाल्याने सरपंचपद टिकवण्याचा निकम यांचा अखेरचा संघर्षदेखील जनतेच्या दरबारात अपयशी ठरला आहे.

अविश्वास ठराव मंजुरीवर 3 हजार 49 ग्रामस्थांनी तर ठरावाच्या विरोधात 1 हजार 777 जणांनी मतदान केले. तब्बल 1 हजार 272 मतांनी हा अविश्वास ठराव मंजूर झाल्याची घोषणा तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी करताच ठराव समर्थक कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत, फटाक्यांची आतषबाजी करत एकच जल्लोष केला. विशेष ग्रामसभेत अविश्वास ठराव मंजूर होण्याची जिल्ह्यात ही पहिलीच घटना मानली जात आहे.

मनमानी कारभार व भ्रष्टाचाराचा आरोप करत दाभाडी ग्रामपालिकेच्या 14 सदस्यांनी लोकनियुक्त सरपंच चारुशीला अमोल निकम यांच्याविरुद्ध उपोषण, आंदोलन सुरू केले होते. गेल्या महिन्यात या सदस्यांनी अविश्वास ठराव आणल्याने तहसीलदर चंद्रजित राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत हा ठराव 14 विरुद्ध 2 मतांनी मंजूर झाल्याने त्याचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांना पाठवण्यात आला होता. शासनाच्या नवीन नियमानुसार या अविश्वास ठरावास मान्यतेसाठी विशेष ग्रामसभा घेण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले होते.

अविश्वास ठरावाचे भवितव्य विशेष ग्रामसभेत ठरणार असल्याने दोन्ही गटातर्फे ठराव मंजूर व नामंजुरीसाठी घरोघरी भेटीगाठी सुरू करण्यात आल्या होत्या. तसेच आरोप-प्रत्यारोप केले जात असल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. दोन्ही गटांतर्फे विशेष ग्रामसभा प्रतिष्ठेची केली गेल्याने सर्व शक्ती पणास लावण्यात आली होती. त्यामुळे आजच्या सभेत काय निर्णय होतो याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते.

काळ सकाळी तहसीलदार चंद्रजित राजपूत, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष ग्रामसभा घेण्यात येऊन मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. सकाळी 7 ते 10 या वेळेत मतदान नोंदणी केली गेली. नोंदणीसाठी मतदारांनी मोठ्या प्रमाणात रांगा लावल्याने अभूतपूर्व मतदान होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. 5 हजार 397 मतदारांची नोंदणी झाल्यानंतर 11 ते 2 या वेळेत मतदान घेण्यात आले. सर्वच केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. निर्धारित वेळेपर्यंत 5 हजार 65 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

मतदान पार पडताच गावातील टी. आर. निकम विद्यालयात मतमोजणीस प्रारंभ करण्यात आला. मतमोजणी पूर्ण झाल्यावर ठरावाच्या बाजूने 3 हजार 49 तर ठरावाविरोधात 1 हजार 777 मते पडली. 239 मते अवैध झाली. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तहसीलदार राजपूत यांनी 1 हजार 272 मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाल्याची घोषणा केली. निकाल जाहीर होताच ठराव समर्थक प्रमोद निकम, अशोक निकम, उपसरपंच सुभाष नहिरे, डॉ. एस. के. पाटील, संजय देवरे, नितीन निकम, जि. प. सदस्या संगीता निकम, कमळाबाई निकम, नीळकंठ निकम, दिलीप निकम, भिकन निकम, भावना निकम, सोनाली निकम, किशोर निकम, अमोल निकम, संजय निकम आदींसह कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत, गुलाल उधळत एकच जल्लोष केला. अनुचित प्रकार घडू नये यास्तव कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com