जि. प. स्थायी समितीवर डी. के. जगताप यांची निवड

जि. प. स्थायी समितीवर डी. के. जगताप यांची निवड

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या ( ZP Standing Committee )रिक्त असलेल्या एका जागेकरता आक्रमक झालेल्या सत्ताधारी शिवसेना ( Shivsena )आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( NCP ) वादात अखेर भाजप आपली जागा राखण्यात यशस्वी ठरला.

राष्ट्रवादीकडून सिद्धार्थ वनारसे व शिवसेनेकडून दीपक शिरसाठ हे दोघे या एका जागेसाठी प्रबळ दावेदार होते. मात्र या दोघांनाही निफाड तालुक्यातील अंतर्गत राजकारण आड आले.

निफाडच्या राजकारणातील वर्चस्वाच्या लढाईत अखेरपर्यंत दोघांमध्ये सहमती न झाल्याने दोघांनाही माघार घ्यावी लागली. यात भाजपचे ज्ञानेश्वर (डी. के.) जगताप ( BJP- D K Jagtap )यांची स्थायी समितीवर बिनविरोध निवड झाली. यामुळे महाविकास आघाडीने भाजपची जागा खेचण्याचा पुरेपूर प्रयत्न केला खरा; परंतु तो अपयशी ठरला.

एकीकडे स्थायी समितीवर जाण्यासाठी चढाओढ सुरू असताना दुसरीकडे मात्र, कृषी, अर्थ समितीकडे सदस्यांनी पाठ फिरवत एकही अर्ज आला नाही. त्यामुळे या समित्यांवरील जागा रिक्तच राहिल्या. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी (दि.8) स्थायी समितीसह विविध समित्यांवरील रिक्त सदस्यांची निवड प्रक्रीया पार पडली.

भाजपच्या कोटयातून अपक्ष यतिन कदम यांचे सदस्यत्व रिक्त झाल्याने या जागेसाठी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी व शिवसेनेत चढाओढ होती.ही जागा भाजपला असल्याने भाजपलाच मिळावी यासाठी भाजपचा पुरेपूर प्रयत्न होता. मात्र, राष्ट्रवादी व शिवसेनेने या जागेसाठी हट्ट धरला.राष्ट्रवादीकडून सिध्दार्थ वनारसे, शिवसेनेकडून दीपक शिरसाठ यांनी तर भाजपकडून ज्ञानेश्वर (डी. के.) जगताप यांनी अर्ज दाखल केले. तीन अर्ज प्राप्त झाल्याने निवडणुकीचा पेच निर्माण झाला. त्यामुळे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी तिढा सोडविण्यासाठी राष्ट्रवादी, शिवसेना गटनेते व पदाधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली.

यात वनारसे व शिरसाठ माघार घेण्यास तयार नव्हते. पदाधिकार्‍यांच्या समजुतीनंतर शिरसाठ यांना बांधकाम समितीवर घेण्याचे निश्चित झाल्याचे समजते. मात्र, शिरसाठ यांनी तात्काळ निवड करण्याचा आग्रह धरला. मात्र, ते शक्य नसल्याने हा तिढा आणखी वाढला. अखेर सर्वांनी समजुत काढल्यानंतर, वनारसे व शिरसाठ यांनी माघार घेतली. त्यामुळे जगताप यांची बिनविरोध निवड झाली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com