
सिन्नर । प्रतिनिधी Sinnar
सध्या देशभरात सायबर गुन्ह्याची ( Cyber Crime ) संख्या वाढत आहे. वेगवेगळ्या प्रलोभनाला बळी पडून आर्थिक व सामाजिक नुकसान करुन घेणारे अनेक लोक भेटतात. विद्यार्थ्यांनाही लुटण्याचे प्रकार घडत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेची जनजागृती करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नाशिक येथील सायबर गुन्हे शाखेचे सहाय्यंक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी केले.
सिन्नर महाविद्यालयात ( Sinnar College ) संरक्षण व सामरिकशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर गुन्हे व सायबर सुरक्षा या विषयावर आयोजीत जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ, उपप्राचार्य प्रा. आर. व्ही. पवार, सहाय्यक निरिक्षक विजय माळी, विजय बोर्हाडे, प्रा. अरुण पोटे, प्रा. दीपक खुर्चे उपस्थित होते. सर्व देशांनी विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने प्रगती केली आणि विविध क्षेत्रांमध्ये त्याचा उपयोग करुन आपल्या सुख सुविधा पूर्ण केल्या. परंतु, याच तंत्रज्ञानाचा दुरुपयोग काही देश व व्यक्तींकडून होताना दिसून येतो.
यातूनच गुन्हे घडले जातात. आज तंत्रज्ञानाच्या सहाय्याने फसवणूकीचे अनेक प्रमार घडत आहेत. बँक फ्रॉडमध्ये गुन्हेगार ग्राहकाला चुकीची माहिती देऊन त्याच्याकडून बँक अकाउंट नंबर व ओटीपी घेऊन त्याच्या खात्यातील सर्व पैसे काढून घेतो. जॉब फ्रॉडमध्ये विविध प्रकारच्या लिंकचा उपयोग करुन युवकांना जॉबची लालच दाखवून फसवणूक केली जाते.
महिला व बालकसंबंधी गुन्ह्यांमध्ये महिलांना व बालकांना ब्लॅकमेल केले जाते. त्यांच्याकडून अश्लील कृत्य करुन घेतले जाते. एप्लीकेशन फ्रॉडमध्ये वेगवेगळ्या अॅप्लिकेशनचा उपयोग करून आपल्या लॅपटॉप व मोबाईलमधील सर्व माहिती काढून घेतली जाते. गेम फ्रॉडमध्ये विविध गेमच्याआधारे नागरिकांना काही भयानक कृत्य करण्यास भाग पाडले जाते. यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. ब्ल्यू वेल्स, पब्जी या गेमद्वारे ही कृती होऊ शकते. मॅट्रीनिटी फ्रॉडमध्ये वेगवेगळे तंत्रज्ञान व सोशल मीडियाद्वारे लग्नाचे आमिष दाखवून प्रेमसंबंध घडवून आणले जातात. त्यामधून पैसे व इतर अश्लील गोष्टी करण्यास भाग पाडले जाते.
मॉरफिंग फ्रॉडमध्ये फेसबुक, इंस्टाग्रामवर डुप्लीकेट अकाउंट तयार करुन फसवणूक केली जात असल्याची माहिती पाटील यांनी दिली. त्यासाठी आपला ओटीपी, बँक अकाऊंट नंबर, आपली व्यक्तिगत माहिती किंवा फोटो कोणालाही देऊ नये किंवा सोशल मीडियावर शेअर करू नये. या सर्व अकाउंटसाठी पासवर्डचा उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले. प्राचार्य रसाळ व पवार यांनी सायबर गुन्हे व सायबर सुरक्षा कार्यक्रमाचे महत्त्व सांगितले.
यावेळी पोलिस शिपाई बिपिन चौधरी, सुनील ढोक्रट, आकाश अंबोरे, आकाश मोरे, प्रा. एस. बी. झाडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचलन प्रा. दीपक खुर्चे यांनी केले. प्रा. अरुण पोटे यांनी आभार मानले.