
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
फेसबुकवरील एका पोस्टला लाईक केल्यानंतर संबंधित व्यक्तीने पाठपुरावा करून वेळोवेळी विविध आमिष दाखवून तब्बल पाच लाख पेक्षा जास्त रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.
नाशिक सायबर पोलीस (Nashik Cyber Police) ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरज बिजली आणि पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून उत्तरप्रदेशातील गाजियाबाद येथून आरोपीला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करण्यात आले असून सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
२७ सप्टेंबर २०२२ रोजी सविता अविनाश पवार (Savita Avinash Pawar) (रा. नाशिक) यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पवार यांचा कॉस्मेटीक प्रोडक्टस (Cosmetic products) तयार करण्याचा घरगुती व्यवसाय आहे. त्यांनी फेब्रुवारी २०२२ च्या अखेरीस फेसबुक वरील व्यापार इन्फो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या फेसबुक पेजला लाईक केले होते.
त्यानंतर वेगवेगळया मोबाईल क्रमांकांवरून त्यांना वारंवार फोन आले. तुम्हाला तुमच्या व्यवसायाची वृध्दी करून देऊ, तुमचा कस्टमर प्लॅटफॉर्म तयार करू, त्यासाठी नोंदणीसाठी २६ हजार रुपये भरा असे सांगितले.
पवार यांनी नकार दिल्याने शेवटी एक हजार रुपये भरावयास संशयित आरोपींनी भाग पाडले. तुमचे प्रोडक्टस घेण्यासाठी मोठे खरेदीदार तयार आहे, परंतु त्यासाठी पेमेंट गेटवेचे लिमिट वाढवावे लागेल अशी वेगवेगळी कारणे देत पवार यांच्या कडून वेळोवळी पैसे भरण्यास लावुन एकुण ५,१३,२०० रूपयांची फसवणुक केली होती.
या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली (Senior Police Inspector Suraj Bijli) व सहायक तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप बोराडे यांनी केला. संशयित आरोपींनी फसवणुकसाठी इंडसइंड बँक खात्यावर पैसे भरण्याचे सांगितले होते असे तपासात समोर आले.
त्याची सखोल चौकशी केली असता हे खाते व्यापार इन्फो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (INFO INDIA PRIVATE LIMITED) या कंपनीच्या नावाने करंट खाते आहे. तर त्याचे संचालक नितिश रमेश कुमार (Nitish Ramesh Kumar) (रा. खोडा कॉलनी, गौतमबुध्द नगर, गाझियाबाद, उत्तरप्रदेश) व राज सोमवीर राघव (रा. शिवपुरी, न्यु विजय नगर, गाझियाबाद, उत्तरप्रदेश) असल्याची माहिती मिळाली.
तर गुन्हेगारांनी वापरलेल्या मोबाईलची तांत्रिक विश्लेषण शाखा नाशिक यांच्याकडून तपासणी करून माहिती घेतली असता तो मोबाईल संशयित आरोपी नितिश रमेश कुमार याचाच असल्याचे समोर आले.
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे तसेच उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या आदेशानुसार आरोपींचा गाझियाबाद येथे जावुन शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिजली यांनी सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप बोराडे, पोलीस हवालदार शहाजी भोर, पोलीस नाईक चंद्रकांत पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, पोलिसांनी नितिश रमेश कुमारला ताब्यात घेतले आहे.