देवळा तालुक्यात फेसबुक खाती होतायेत हॅक

देवळा तालुक्यात फेसबुक खाती होतायेत हॅक

देवळा | विशेष प्रतिनिधी

मी आजारी असून हॉस्पिटलमध्ये भरती झालो आहे, उपचारासाठी मला पैशांची गरज आहे, किंवा मला तातडीने पैशांची गरज असून माझ्या खात्यात त्वरित पैसे टाका, असा संदेश फेसबुक प्रोफाइल हॅक करून आपले मित्र आणि नातेवाइकांना पाठविण्यात आले होते. सुदैवाने या घटनेला कुणी बळी पडले नाहीत. ही बाब लक्षात आल्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर हॅकर्सकडून देवळा तालुक्यातील अनेकांचे फेसबुक प्रोफाईल हॅक करण्यात आल्या असून असे अनेक प्रकार समोर आल्याने नागरीकांना या गोष्टीचा मनस्ताप भोगावा लागला आहे.

देवळा येथील व्यापारी कौतिक पवार, अतुल आहेर, मुख्याध्यापक चंद्रकांत आहेर, नितिन गुंजाळ आदींना फेसबुक आयडी हॅक झाल्याचा अनुभव आला आहे.

अतुल आहेर यांचे फेसबुक आयडी हॅक करून त्यांच्या नातेवाईक आणि अनेक मित्रांना संदेश पाठवण्यात आले. अतुल आहेर हे दवाखान्यात ॲडमीट असून त्यांना १० ते २० हजार रूपयांची मदत करा, असा उल्लेख मेसेजमध्ये करण्यात आला होता.

दुदैवाने त्यांच्या नाशिक मधील एका मित्राने फारशी चौकशी न करता त्वरीत ३ हजार रूपये हॅकर्सने सांगितलेल्या अकाऊंटमध्ये फोन पेनेद्वारे टाकून दिले व नंतर अतुल आहेर यांच्या प्रकृतिची चौकशी करण्यासाठी संपर्क साधला असता फसवणुक झाल्याचे निदर्शनास आले.

दुसऱ्या एका मित्राने ८ हजार रूपये अकाऊंटला टाकले परंतु तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे त्यांचे पैसे वाचले. नंतर अतुल आहेर यांनी खुलासा केला कि ते हॉस्पीटलमध्ये दाखल नसून त्यांनी फेसबूकवरून कोणतीही मदत मागितलेली नाही. यानंतर त्यांनी एक पोस्ट करून आपल्या मित्रांना झालेल्या प्रकाराबाबत माहिती दिली.

यानंतर आहेर यांनी देवळा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पोलिसांना संपूर्ण माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना फेसबुक आयडी लॉग आऊट करून मित्रांना माहिती देण्याचा सल्ला दिला.

प्रतिष्ठित व्यक्तींचे फेसबुक अकाउंट हॅक करून फसवणूक करण्याचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांना फेसबुकवरुन विविध कारणे सांगून पैशाची मागणी झाल्यास त्याला कोणीही प्रतिसाद देऊ नका. संबंधित व्यक्तीला फोन करून विचारूनच पैशाचा व्यवहार करा. माझे फेसबुक अकाउंट हॅक झाल्यानंतर मी सायबर क्राईमकडे ऑनलाईन तक्रार दिली आहे

कौतिक पवार, व्यापारी, देवळा.

माझे अकाउंट हॅक झाल्याची बाब मित्रांना समजल्यामुळे हॅकरने केलेल्या पैशांच्या मागणीला कोणीही प्रतिसाद दिला नाही. दुसऱ्या दिवशी हॅकरने बनावट व्हाटस अप अकाउंटला माझा फोटो डिपीला लाऊन पुन्हा एका मित्राकडे पैशाची मागणी केली, परंतु मित्राला घडलेल्या प्रकाराची कल्पना असल्यामुळे फसवणुक टळली. पैसे पाठवतांना योग्य ती खबरदारी घ्यावी

अतुल आहेर, शेतकरी, देवळा

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com