पंचवटी । Panchavti

सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर गोदाघाट परिसरात नागरिकांकडून गर्दी केली जाण्याची शक्यता असल्याने, याठिकाणी पोलीस प्रशासनाने जमावबंदी आदेश लागू केले आहेत. सोमवारी (दि.२९) रामकुंडावर दिवसभर शुकशुकाट असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

यातही व्यावसायिकांनी आपापली दुकाने बंद ठेवल्याने अधिकच भर पडली. पंचवटी पोलिसांनी रामकुंडाच्या दिशेने येणारे सर्व मार्ग बॅरिकेड्स लावून बंद केले होते.

गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. ही कोरोनाची दुसरी लाट असल्याचे बोलले जात आहे. होळी, धुलिवंदन व रंगपंचमी या सणांना गोदाघाट परिसरात हजारो नागरिकांची होणारी गर्दी पाहता त्यातून करोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. हे लक्षात घेता या परिसरात पोलिसांकडून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे या परिसरात नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

नुकताच होळी सण कोरोनाच्या सावटाखाली साजरा करण्यात आला. सार्वजनिक स्वरूपात हा सण साजरा झाला नसला तरी अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या होळया पेटविण्यात आल्या होत्या. धुलिवंदनच्या दिवशी शहरासह पंचवटी परिसरात पारंपरिक पद्धतीने वीर नाचवून घरातील देवांना गोदावरी नदीत स्नान घालून तळी भरण्याची धार्मिक परंपरा आहे.

धुलिवंदन च्या दिवशी मिरवणूक काढून वीर नाचविण्याची परंपरा आहे. यामुळे होणारी गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाने रामकुंडासह गोदाघाट परिसरात जमावबंदी आदेश लागू केले आहेत.

सोमवारी (दि.२९) सकाळ पासून रामकुंडाच्या दिशेने येणारे सर्व मार्ग बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले होते. सरदार चौक, मालवीय चौक, इंद्रकुंड, मालेगाव स्टँड आदी भागात बॅरिकेड्स लावण्यात येऊन सर्वच वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली होती.

तसेच रामकुंड भागात असलेल्या सर्वच व्यावसायिकांनी आपापली दुकाने बंद ठेवली होती. तर काही पायी येणारे नागरिक रामकुंड ठिकाणी येत असल्याने, कपालेश्वर पोलीस चौकीतून लाऊडस्पीकर द्वारे गर्दी न करण्याचे आवाहन पोलीस दिवसभर करीत होते.