
निफाड । प्रतिनिधी Niphad
आर्द्रा नक्षत्राच्या पावसाने ( Rain ) तालुक्याच्या सर्वच भागात जोरदार हजेरी लावल्याने तालुक्याच्या प्रमुख बाजारपेठेत खते, बियाणे ( Seeds & Fertilizers ) खरेदीसाठी शेतकरी गर्दी करू लागले आहेत. गत दोन वर्षांपासून सोयाबीनचे वाढते बाजारभाव बघता यावर्षीदेखील शेतकर्यांचा सोयाबीन ( Soyabean )बियाणे खरेदीकडे कल वाढताना दिसत असून कृषी विक्रेत्यांकडे वेगवेगळ्या कंपन्यांची बियाणे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल झाली आहेत. तब्बल महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावल्याने बाजारपेठेतील मंदीचे वातावरण काही प्रमाणात कमी झाले असून पावसामुळे खरीप हंगामातील पेरणीपूर्व शेती मशागतीच्या कामांना वेग आला आहे.
यावर्षी पावसाळ्यातील मृग नक्षत्र कोरडेठाक गेले. साहजिक पेरणीची कामेदेखील खोळंबली होती. आर्द्रा नक्षत्रास प्रारंभ होताच दुपारनंतर आकाशात ढगांनी दाटी केली अन् सायंकाळी 5 वाजेनंतर पावसाने संपूर्ण तालुक्यात जोरदार हजेरी लावली. साहजिकच गुरुवारी लासलगाव, निफाड, पिंपळगाव, विंचूर, ओझर, सायखेडा या प्रमुख बाजारपेठांबरोबरच ग्रामीण भागातील कृषी विक्रेत्यांकडे देखील शेतकर्यांनी खते, बियाणे खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती.
काल पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले असून खरीप हंगामातील पेरण्यांना वेग आला आहे. बाजारपेठेत मका बियाणांमध्ये डी.के.सी.9141, डी.के.सी.9178, डी.के.सी.9210, सी.पी.858, सी.पी.333, विको विक्रांत, विको परमेश्वर, कृषिधनचे इंद्रा 117 आदी जातींचे बियाणे दाखल झाले असून यात सी.पी.333, विको विक्रांत, डी.के.सी. या वाणांना शेतकर्यांची पसंती लाभत आहे. तर सोयाबीन बियाणांमध्ये जे.एस.335, जे.एस.9305, के.एस.एल. 441, सोयाकिंग, करिश्मा, फुले, संगम, आर.एच.228 आदी जातीची बियाणे विक्रीसाठी दाखल झाली असून यात आर.एच.228, करिश्मा, फुले, संगम, जे.एस.9305, जे.एस.एल.441 आदी वाणांना शेतकर्यांची पसंती मिळत आहे.
तालुक्यात दरवर्षी सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होताना दिसत आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे बाजारात सोयाबीनला मिळणारा भाव तसेच त्याची टिकवण क्षमता यामुळे सोयाबीन पेरणीला शेतकरी पसंती देत आहेत. मूग बियाणांमध्ये धनवान, कोपरगाव, बी.एस.एम.आर 2022 तर तुर मध्ये एस.एम.आर 736, उडीदमध्ये धनवान, यशोदा, भुईमूगमध्ये वेस्टन 44, एस.बी.11, जे.एन.24 आदी जातीची बियाणे दाखल झाली आहेत.
तसेच जमिनीची सुपीकता वाढावी यासाठी शेतकरी ताग पेरणीलादेखील महत्त्व देत असल्याने हे बियाणे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी ठेवण्यात आले असून रोपवाटिकेत टोमॅटो, मिरची, वांगे, कारलेे, भेंडी, गवार आदी तयार रोपांनादेखील मागणी वाढली आहे. एकूणच पाऊस पडता झाल्याने शेतकर्यांची खरिपाची लगबग सुरू झाली आहे. खरिपाचा हंगाम यशस्वी व्हावा यासाठी कृषी विभागानेदेखील नियोजन केले असून खते, बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.
खात्रीच्या दुकानातून बियाणे खरेदी करा
खरीप हंगामात शेतकर्यांना बनावट खते, बियाणांचा सामना करावा लागू नये यासाठी शेतकर्यांनी खात्रीच्या दुकानातून खतेे, बियाणे, औषधे खरेदी करावी तर खरेदीनंतर लॉट लेबलचे पक्के बिल घ्यावे. तसेच जमिनीत पूर्ण ओल होईपर्यंत पेरणी करू नये. खतांची अथवा बियाणांची कृत्रिम टंचाई होत असल्यास शेतकर्यांनी तत्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा.
ब.टू. पाटील (तालुका कृषी अधिकारी)
सोयाबीन पेरणीकडे कल
गेल्या काही वर्षांपासून सोयाबीनला समाधानकारक भाव मिळत असल्याने व सोयाबीनची टिकवण क्षमता चांगली असल्याने शेतकरी सोयाबीन पेरणीला सर्वाधिक पसंती देत असल्याने सोयाबीन बियाणांना मागणी वाढत आहे. त्या तुलनेत इतर पिकांचे बियाणांत थोडीसी घट होताना दिसत आहे. सोयाबीनखालोखाल शेतकरी मका लागवडीला प्राधान्य देत आहेत.
दीपक कातकाडे (कातकाडे कृषी सेवा केंद्र, निफाड)