सिन्नर । Sinnar (प्रतिनिधी)

सिन्नर-नाशिक महामार्गावरील शिंदे येथील टोलनाक्यावरील वाहतूक कोंडीने वाहनधारक त्रस्त होत आहेत. टोल नाक्यावरील 50 टक्क्यावरील लाईन्स (मार्गीका) बंद रहात असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.

फास्ट टॅग घेणार्या वाहन चालकांनाही या वाहतूक कोंंडीचा फटका बसत असून 15-15 मिनीटे त्यांना तेथे थांबणे भाग पडत आहे. सेवक कपात करुन पैसे वाचवण्याच्या नादात टोल चालवणार्या कंपनीकडून वाहनधारकांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप होत आहे.

शिंदे येथे उभारण्यात आलेल्या टोलवर जाण्या-येण्यासाठी स्वतंत्र मार्गीका आहेत. एकाच वेळी या सर्व मार्गीका कधीही सुरु नसतात. त्यामूळे मार्गीकांवर लांबच लांब रांगा लागत असल्याचे चित्र नेहमीच दिसते. किमान रांगा वाढल्यावर तरी बंद मार्गीका सुरु करायला हव्यात. मात्र, तशी तसदीही कंपनीकडून घेतली जात नाही. लांगलेल्या रांगामध्ये काही कार, जीपचालक शिरतात आणि पूर्ण रांग बिघडवून टाकतात.

अशावेळी कंपनीकडून वाहन चालकांना शिस्त लावण्यासांठी कंपनीकडून कुणीही येत नाही. बंद मार्गींकांच्या जागेवर कंपनीचे अनेक लोक केवळ बसून असतात. त्यांना होणारी वाहतूक कोंडी अथवा रांग सोडून मध्येच शिरणार्या वाहन चालकांशी काहीही देणे-घेणे नसते.

एखाद्या वाहन चालकाने केबीनमधील महिला सेविकेशी वाद घातला तरच ही मंडळी धाव घेते. इतर वेळी बसण्यापलीकडे त्यांना कुठलेही काम नसते. त्याचा फटका सर्वसामान्य वाहन चालकांना होत असून सततच्या वाहतूक कोंडीमूळे 15-15 मिनीटे रांगेत उभे राहण्याची शिक्षा पैसे देऊन त्यांना भोगावी लागत आहे.

वेळ वाचावा म्हणून अनेक वाहन चालकांनी फास्ट टॅग सुविधा घेतली आहे. त्याच्यांसाठी स्वतंत्र मार्गीका राखीव ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, या टोल नाक्यावर सर्वच मार्गीका फास्ट टॅगसाठी ठेवण्यात आल्याने इतर वाहनांच्या मागे फास्ट टॅग घेतलेल्या वाहन चालकांना रांग लावावी लागते. त्यात 15 ते 20 मिनटिांपर्यंत वेळ जात आहे. सिन्नरहून नाशिकरोडला पोहचण्यास यापूर्वी केवळ 20 मिनिटे लागत होती.

मात्र, टोल नाक्यावरील नियोजनशूक्य कारभारामुळे आता 40 मिनीटांपर्यंतचा वेळ जात आहे. अशीच वाहतूक कोंडी राहणार असेल तर टोल नाका काय कामाचा असा प्रश्न सर्वसामान्य वाहन चालक विचारत आहेत. टोल चालवणार्या कंपनीने योग्य नियोजन करुन टोल नाक्यावर होणारी वाहतूक कोंडी कमी करावी व सर्वसामान्य वाहन चालकांचा प्रवास वेळ वाचवून सुखकर करावा अशी मागणी होत आहे.

नेहमी सिन्नर-नाशिक प्रवास करावा लागतो. मात्र, फास्ट टॅग धारकांसाठी स्वतंत्र मार्गीका नाही. अनेक मार्गीकांवर दूचाकी अथवा रिकामी पिंप ठेवून मार्गीका बंद असतात. त्याचा अनाव्श्यक फटका बसतो आणि 15-20 मिनिटांपर्ययतचा वेळ जातो. राष्टीय महामार्ग विभागाने यात लक्ष घालावे व कृत्रीम वाहतूक कोंडी निर्माण करणार्या कंपनीच्या जाचापासून वाहन चालकांची सुटका करावी.
कैलास क्षत्रिय, चेअरमन कस्तूरी पतसंस्था