संत निवृत्तीनाथ पालखी दर्शनास रिघ; सिन्नरकरांकडून जल्लोषात स्वागत

संत निवृत्तीनाथ पालखी दर्शनास रिघ; सिन्नरकरांकडून जल्लोषात स्वागत

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या (Shri Nivruttinath Maharaj) पालखीचे (Palkhi) आज (दि.17) सकाळी सिन्नरकरांकडून उत्साहात स्वागत करण्यात आले. शहरातील गावठा परिसरात पालखी आल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केल्याचे बघायला मिळाले.

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून निघालेली पालखी गुरुवारी (दि.16) सिन्नर तालुक्यात दाखल झाली. पास्तेचा अवघड घाट चढून पालखी सायंकाळी लोणारवाडी (lonarwadi) येथे पोहचली होती. घाटातून चढताना व गावात पोहचल्यानंतरही वारकर्‍यांचा उत्साह कमी झालेला नव्हता.

गेल्या अनेक वर्षांपासून लोणारवाडी ग्रामस्थांकडुन दिडींत सहभागी हजारो वारकर्‍यांचे (varkari) आदरातिथ्य करण्याची परंपरा आहे. पालखीच्या मुक्कामाची व वारकर्‍यांच्या भोजनाची व्यवस्था तेथे केली होती. गावातील भैरवानाथ मंदिर ते मारुती मंदिरापर्यंत मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत पालखीचे वाजत-गाजत स्वागत करण्यात आले.

यावेळी गावाला मोठ्या यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. यानंतर आज (दि.17) सकाळी पालखीचे सिन्नरकडे (sinnar) प्रस्थान झाले. शहरातील गावठा परिसरातील मारुती मंदिराजवळ दिंडीचे लोकप्रतिनिधी व भाविकांच्यावतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी माजी आमदार राजाभाऊ वाजे (Former MLA Rajabhau Waje), जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सिमंतीनी कोकाटे (Former Zilha Parishad member Simantini Kokate) यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी (political leaders) उपस्थित राहून दर्शन घेतले. यानंतर पालखी गावठामार्गे नेहरु चौकात आल्यानंतर येथील मित्र मंडळाच्यावतीने वारकर्‍यांना पाणी, फळे, लाडूचे वाटप करण्यात आले.

नवापूल मार्गे पालखी गणेशपेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहचली. कालभैरवनाथ मंदिर परिसरात वारकर्‍यांना खिचडीचे वाटप करण्यात आले. येथून पालखीने वावी वेस मार्गे शिर्डी महामार्गाकडे प्रस्थान केले. शहरात पालखीच्या दर्शनासाठी व स्वागतासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. अनेक महिलांनी यावेळी फुगडी खेळत आनंद लुटला. तालुकाभरातून भाविक दर्शनासाठी उपस्थित होते. सिन्नर पोलिस ठाण्याकडून यावेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दरवर्षी नगराध्यक्षच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात येते. मात्र, सध्या नगर परिषदेवर प्रशासक असल्याने यंदा प्रशासक अर्चना पठारे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. तहसिलदार राहुल कोताडे, मुख्याधिकारी संजय केदार, पोलिस निरिक्षक संतोष मुटकुळे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांनीही सपत्त्नीक पालखीची पूजा केली. यावेळी विविध राजकीय पक्षाचे नेतेही उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com