पंचवटी परिसरात पर्यटकांची गर्दी

धार्मिक ठिकाणांना पसंती; करोनाबाबत ठिकठिकाणी जनजागृती
पंचवटी परिसरात पर्यटकांची गर्दी

पंचवटी । प्रतिनिधी Panchavati

नाताळ सणाची सुट्टी व येणारे नवीन वर्ष लक्षात घेता पंचवटी परिसरात ( Panchavati )पर्यटकांनी ( Tourists)गर्दी केली आहे. नाशिक मधील पंचवटी परिसर धार्मिक व पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आणि सुंदर असल्याने नेहमीच पर्यटकांच्या गर्दीने गजबजलेला असतो. सतत दोन वर्षांच्या करोना महामारीत पर्यटकांना पर्यटनासाठी नाशिक शहरात इच्छा असूनही येता आले नाही. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आणि सर्व सुरळीत सुरू झाले.

त्यामुळे पर्यटकांनी नवीन वर्षाची सुरुवात आणि नाताळच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पंचवटी परिसरातील सर्व धार्मिक ठिकाणी दर्शनासाठी गर्दी केलेली दिसत आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश तामिळनाडू मध्य प्रदेश आदी विविध राज्यांतून भाविक आणि पर्यटकांचा ओघ वाढला आहे.

रामकुंड, गोदाघाट, श्री काळाराम मंदिर, सांडव्यावरची देवी मंदिर, तपोवन परिसर, कपालेश्वर, सीता गुंफा पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी गेल्या चार-पाच दिवसांपासून भाविकांची व पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढल्याने परिसर गजबजून गेला आहे.

गेल्या दोन वर्षांपूर्वी करोनाचा प्रादुर्भाव फारच वाढला होता व करोनाच्या काळातील निर्बंधांमुळे मंदिरे देखील बंद होती. प्रेक्षणीय स्थळेदेखील बंद होती. ही बंधने सर्वांनाच अवघड झाली होती. परंतु यावर्षी मात्र करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने व नाताळची सुट्टी मिळाल्याने नवीन वर्षाचे स्वागत करताना आनंद घेण्यासाठी पर्यटक व भाविकांनी गर्दी केली आहे.

सोमवारपासून विविध धार्मिकस्थळांवर भाविकांनी गर्दी केली आहे. चीनमध्ये पुन्हा करोनाने धुमाकूळ घातल्याने नाशिक शहरातील धार्मिक स्थळांमध्ये करोनाबाबत सूचनाफलक लावण्यात येत आहेत. करोनापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने सामाजिक अंतर बाळगणे, सॅनिटायझरचा वापर करणे व मास्क घालून दर्शनाचा लाभ घेणे, अशा सूचना विविध मंदिरांच्या व्यवस्थापनाने दिल्या आहेत. मंदिरात प्रवेश करताना मंदिराबाहेर उभ्या असणार्‍या सुरक्षारक्षकांनीदेखील काळजी घेण्याबाबत प्रबोधन सुरू केले आहे.

मंगळवार-बुधवारी काळाराम मंदिर, कपालेश्वर, रामकुंड परिसर व तपोवन परिसरात अनेक शाळा व महाविद्यालयांच्या सहलीदेखील दाखल झाल्या आहेत. विद्यार्थ्यांची मोठी संख्या दिसून येत आहे. पर्यटकांच्या वाहनांची संख्या वाढल्याने रामकुंड, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, रोकडोबा या ठिकाणी पार्किंग फुल झाली आहे. गर्दीच्या ठिकाणांवरून तपोवनातील मोकळ्या व निसर्ग रम्य वातावरणाकडे पर्यटक जाऊन आनंद घेत आहेत. तपोवनातील श्रीराम पर्णकुटी, सर्वधर्म मंदिर, बडा लक्ष्मीनारायण मंदिर, लक्ष्मण मंदिर, सुरपनखा मंदिर येथे नव्यानेच उभारलेल्या स्वामीनारायण मंदिर येथेही भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. कपिला संगमावरच्या खडकावर फेरफटका मारताना व रामसृष्टी उद्यानात पर्यटकांची चांगलीच वर्दळ वाढलेली दिसून येत आहे. उद्यानाच्या हिरवळीवर थांबणार्‍यांची गर्दी वाढल्याने उद्यान गजबजून गेले आहे.

करोनाचा शिरकाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे श्री काळाराम मंदिर संस्थानने मंदिर परिसरात करोनात काय काळजी घ्यावी याबाबत जनजागृतीचे फलक लावण्यात आले आहे. भाविकांना प्रवेशद्वारावरच मास्कची सक्ती करण्यात येताना दिसत आहे. सॅनिटायझरने हाच स्वच्छ करून मगच प्रवेश घ्यावा, असे सांगितले जात आहे. त्याचबरोबर सुरक्षारक्षक सुरक्षित अंतर ठेवण्याचे प्रबोधन करीत आहेत.

व्यावसायिक समाधानी

पर्यटकांवर अवलंबून असणार्‍या अनेक व्यावसायिकांनी त्यांचे व्यवसाय नव्याने पुन्हा थाटले आहेत. कित्येक दिवसापासून ठप्प झालेल्या या व्यवसायिकांना चांगलाच फायदा होत असल्याचे व्यावसायिकांनी बोलून दाखवले आहे. गर्दीनिमित्ताने आपला व्यवसाय सुरळीतपणे व चांगल्या पद्धतीने चालू असल्याने व्यावसायिकांच्या चेहर्‍यावर समाधान दिसत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com