सेतू, ई-सेवा केंद्रात विद्यार्थ्यांची गर्दी

महाविद्यालयीन प्रवेशाच्या पूर्वतयारीला वेग
सेतू, ई-सेवा केंद्रात विद्यार्थ्यांची गर्दी

सिन्नर । वार्ताहर Sinnar

राज्यातील दहावी( SSC ), बारावी परीक्षेच्या( HSC Results ) निकालाच्या ( पार्श्वभूमीवर महाविद्यालयीन प्रवेशासाठी लागणार्‍या कागदपत्रांची ( Certificates ) जमवाजमव करण्यासाठी शहरातील सेतू, इ-सेवा केद्रांवर ( Setu, E-Seva Kendra )विद्यार्थ्यांची गर्दी होताना दिसत आहे.

महाविद्यालयीन प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सवलत, मिरीट फॉर्मसाठी व इतर शैक्षणिक कामांसाठी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉनक्रिमिलेअर, डोमोसाईल, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रांची गरज भासत असते. त्यामुळे परीक्षेचा निकाल लागण्याच्या आधीच विद्यार्थी व पालकांकडून सध्या या प्रमाणपत्रांची जमावाजमव करण्यासाठी धावपळ सुरु झाल्याचे बघायला मिळत आहे.

बारावीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता असून पदवी अभ्यासक्रमांसाठी लवकरच महाविद्यालयात प्रवेशप्रकिया सुरु होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत अनेक विद्यार्थी, पालक सेतू व महा ई-सेवा केंद्रांवर प्रमाणपत्र काढण्यासाठी गर्दी करत आहेत. दोन वर्षांपासून कोरोनामुळे बालवाडीपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा ऑफलाईन घेण्यात आल्या. अशात बारावीचा निकाल आज (दि. 8) लागणार आहे.

तर दहावीचा जूनच्या शेवटच्या आठवड्यात निकाल जाहीर करण्यात येईल अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. निकालापाठोपाठ प्रवेश प्रक्रियाही सुरु होणार आहे. प्रवेशासाठी लागणार्‍या आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रांची यादी तंत्रशिक्षण संचलनालयाने जाहीर केली आहे. त्यामुळे उच्चशिक्षणाच्या प्रवेशाचा बिगुल वाजला असल्याने प्रवेशपूर्व तयारीला वेग आला आहे. ऐनवेळी होणारी गर्दी व गैरसोय टाळण्यासाठी अनेकांनी मे महिन्यातच दाखले मागणी अर्जही देऊन ठेवले आहेत.

ऑनलाईन प्रवेशप्रक्रियाही वेग घेणार

करोना काळापासून बहुतांश प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईनच झाली आहे. शाळा महाविद्यालये आपापल्या स्तरावर आपली लिंक तयार करुन त्याव्दारे ऑनलाईन प्रवेश अर्ज स्वीकारत आहेत. अकरावी, बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी. तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश काही दिवसांमध्ये सुरु होणार आहेत. प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्र स्कॅन करणे, चलन काढणे यासह अन्य महत्त्वाची कामे ही नेट कॅफेवर केली जातात. त्यामुळे 10 वी व 12 वीचे निकाल लागल्यानंतर नेट कॅफेमधीलही गर्दी वाढण्यास सुरुवात होणार आहे.

आज 12 वीचा निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12 वी परिक्षेचा निकाल आज (दि.8) दुपारी 1 वा. जाहीर होणार आहे. 10 वी व 12 वीच्या परिक्षा यंदा ऑफलाईन पध्दतीने घेण्यात आल्या होत्या. राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी पेपर चेकिंगवर बहिष्कार टाकला आणि बारावीचा निकाल कसा आणि कधी लागणार असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. मात्र, उद्या निकाल जाहीर होणार असल्याने विद्यार्थी व पालकांची निकालाची प्रतिक्षा संपली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com