नाशिक । Nashik

राज्य शासनाकडुन अलिकडेच करोना साथीच्या पार्श्वभूमीवर नऊ महिने बंद असलेली पर्यटनस्थळे खुले करण्यास परवानगी दिल्यानंतर सर्वत्र पर्यटन स्थळे गजबजुन गेली आहे. यात नाशिक शहरातील गंगापूर धरणावरील बोटक्लबवर तोबा गर्दी होऊ लागली आहे.

यातच शनिवारी (दि.2) गोदावरी नदीला धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर शहरातील आकर्षणाचा केंद्र व पर्यटनस्थळ असलेल्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. नाशिक शहरात करोनाचा संसर्ग कमी प्रमाणात सुरू असतांना कोणतेही नियम धाब्यावर बसवून सोमेश्वरला नागरिकांनी गर्दी केली आहे.

नाशिक शहरातील पर्यटनस्थळापैकी सर्वात आकर्षण असलेल्या सोमेश्वर मंदीर व धबधब्याला रविवारी (दि.3) परिसराला वेढा पडल्याचे दिसुन आले. गेल्या आठ - नऊ महिने करोनामुळे अडकुन पडलेले नागरिक व शाळा - महाविद्यालये बंद असल्याने घरात अडकून पडलेले विद्यार्थी यांच्याकडुन सोमेश्वर मंदिर दर्शन व धबधब्यावरील पर्यटनांला पसंती देण्यात आल्याचे दिसुन आले.

शनिवारी गोदावरी नदीला आवर्तनाचे पाणी सोडण्यात आल्यानंतर शहरातील रामकुंड परिसरात पर्यटकांची गर्दी दिसली, यापेक्षा मोठी गर्दी सोमेश्वर परिसरात दिली. याठिकाणी महिला, मुले व युवक - युवतींची मोठी गर्दी झालेली असतांना याठिकाणी मास्कचा वापर होत नसल्याचे दिसुन आले.

तसेच धबधब्याकडे उतरण्याचा मार्ग चिंचोळा असल्याने या लहान मार्गावर पर्यटकांनी मोठी ये जा सुरु होती. तसेच धबधब्याजवळ ठराविक ठिकाणी काठावर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसुन आली. याठिकाणी पर्यटकांनी मंदिर व धबधबा खुला झाल्याने समाधान व्यक्त केले.

सोमेश्वरला अचानक शनिवार पासुन गर्दी दिसुन लागल्याने या भागातील पुजा साहित्य, फळे व इतर वस्तुंचे विक्रेते यांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या आठ नऊ महिन्यापासुन याठिकाणच्या विक्रेत्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता.

अनेक महिने शांत बनलेला परिसर पर्यटकांच्या उपस्थितीने गजबजला आहे. अशाप्रकारे सोमेश्वर मंदिर व धबधबा यांना गर्दीचा वेढा धबदब्याला बसलाचे दिसुन आल्याने यातून करोना संसर्ग होण्याची भिती आता व्यक्त केली जात आहे.