
नाशिक। प्रतिनिधी Nashik
देशभरातून आलेल्या भाविकांच्या मांदियाळीत शनिवारी मांगीतुंगी ( Mangitungi )सिद्धक्षेत्र फुलून गेले. मूर्तीसमोरच्या प्रांगणात भाविकांनी अभिषेक, पूजन करण्यास गर्दी केली होती.
मांगीतुंगी येथे पहाटेपासून भाविकांची सहकुटुंब दर्शनासाठी रीघ लागली होती. सकाळपासून उत्साहात भगवान ऋषभदेवांच्या ( Lord Rishabhdeva )108 फुटी उंंच मूर्तीवर पंचामृत महामस्तकाभिषेक ( Mahamastakabhishek )करण्यात येत होता.
पंचामृत कलशाचा मान पुण्याच्या सुजाता शहा व परिवाराला देण्यात आला होता. अभिषेकापूर्वी त्यांनी पुणे जैन संघटनेतर्फे पीठाधीश कर्मयोगी रवींद्रकीर्ती स्वामीं यांचा पुणेरी पगडीने सत्कार केला. यावेळी महोत्सव समिती पदाधिकार्याचाही गौरव करण्यात आला.
प्रथम कलशाचा मान कोलकात्याचे अजित पांड्या व त्यांच्या परिवारातील सदस्यांना देण्यात आला. महामस्तकाभिषेकाच्या प्रारंभी संकल्प, प्रार्थना यांचे पौरोहित्य हस्तिनापूरचे प्रधान आचार्य विजय जैन, सांगलीचे दीपक पंडित व सत्येंद्र जैन यांनी केले.
महाशांतीधारा कलशाचा मान राजस्थानातील भाविकांना मिळाला होता. पीठाधीश रवींद्रकीर्ती स्वामीं, महामंत्री संजय पापडीवाल, प्रमोद कासलीवाल व पदाधिकार्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.