बाजार समितीसमोर सामाजिक अंतराचा फज्जा

सकाळ -सायंकाळ होतेय नागरिकांची गर्दी
बाजार समितीसमोर सामाजिक अंतराचा फज्जा

पंचवटी । वार्ताहर

करोनाची चेन ब्रेक होण्यासाठी प्रशासनाच्या वतीने दि.12 पासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र क्षेत्रात कडकडीत बंदची अंमलबजावणी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने कृषी उप्तन्न बाजार समितीसह सर्वच व्यवहारांना मज्जाव केला आहे.

परंतु शेतमाल नाशवंत असल्याने त्याची रोजच्या रोज विक्रीशिवाय पर्याय उरलेला नाही. या परिस्थितीत समितीच्या दिंडोरीरोड आणि पेठरोडवरील रस्त्यावर विक्रेते व अन्य खरेदीदार मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असून येथुन करोनाचे सुपरस्पेडर होण्याची शक्यता आहे. आणि याच ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरशः फज्जा उडत आहे.

दिंडोरीरोडसह पेठरोड वरील नाशिक कृषी बाजार समिती जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर गेल्या आठवड्यापासून बंदच आहे. त्यातच आगोदरच नाशवंत असलेल्या शेतमालाची नुकत्याच झालेल्या बेमोसमी पावसाने देखील काही प्रमाणात नुकसान झाले. त्यातच बाजार समितीही बंद असल्याने शेतकरी आस्मानी अन सुलतानी असे दुहेरी संकटात पुरता सापडला आहे.

पिकविलेल्या मालाचे पुरेेसे मुल्य मिळाले नाही तरी चालेल, परंतु पेरणीचा खर्च तरी सुटावा, म्हणून शेतकरी बाजार समितीचा प्रवेशद्वाराजवळ तसेच मिळेल त्या जागी भाजीपाल्याची विक्री करत आहे. दोन दिवसपूर्वी टॉमेटोची जाळी अक्षरश:20रुपयात म्हणजेच दोन रुपये प्रती किलोने विकली गेली. याठिकाणी खरेदीसाठी छोट्या मोठ्या व्यावसायिकांसह किरकोळ ग्राहकही मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असल्याचे चित्र आहे.

सकाळ व सायंकाळी तर गर्दीचा उच्चांक होतो, ही बाब करोना वाढीसाठी कारणीभूत ठरू शकते, एकीकडे जिल्हा आणि पोलिस प्रशासनाने बाजारात होणा-या गर्दीवर अंकुश ठेवण्यासाठी समितीला कामकाज बंद ठेवण्यास सांगितले तर दुसरीकडे मात्र बाजार समितीच्या आवाराबाहेर होणारी गर्दी रोखणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com