नाशिकरोडला बाजारपेठेत शुकशुकाट
नाशिक

नाशिकरोडला बाजारपेठेत शुकशुकाट

करोना बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण तिप्पट

Abhay Puntambekar

नाशिकरोड । प्रतिनिधी NashikRoad

परिसरात गेल्या काही दिवसांपासून करोना बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण तिपटीने वाढले असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याचा परिणाम येथील बाजारपेठेच्या गर्दीवर झाला असून शहरातील मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत आहे.

गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून परिसरातील जेलरोड, देवळालीगाव, विहितगाव, सिन्नरफाटा, दत्तमंदिर रोड, जय भवानी रोड, दसक, पंचक, गोसावीवाडी, सौभाग्यनगर, चेहेडी, सामनगाव रोड या भागात सातत्याने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. गोसावीवाडी, देवळालीगाव, राजवाडा या परिसरात दाट वस्ती असल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. यापूर्वी देवळालीगावाजवळील रोकडोबावाडीत पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले नव्हते. परंतु मंगळवारी येथेसुद्धा चार रुग्ण आढळून आल्याने चिंतेचे वातावरण आहे.

दरम्यान रुग्णवाढीमुळे शासकीय यंत्रणा व पोलसी प्रशासन हादरून गेले असून अनेक ठिकाणी आता कडक निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. मात्र तरीही परिसरातील काही ठिकाणी शासनाच्या नियमांचे पालन केले जात नाही. सातत्याने होणार्‍या रुग्णवाढीमुळे परिसरातील टिळकपथ, बिटको चौक, गायकवाड मळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, वॉस्को चौक या भागातील बाजारपेठेवर परिणाम झाला असून तुरळक गर्दी दिसून येते.

Deshdoot
www.deshdoot.com