हरडे-करडे खरेदीला नागरिकांची पसंती; गुढीपाडवा पूर्वसंध्येला बाजारपेठेत गर्दीचा माहोल

हरडे-करडे खरेदीला नागरिकांची पसंती; गुढीपाडवा पूर्वसंध्येला बाजारपेठेत गर्दीचा माहोल

निफाड । Niphad (प्रतिनिधी)

मराठी नववर्षाचा पहिला दिवस अर्थात गुढीपाडवा सणाच्या पूर्वसंध्येला हरडे-करडे सह इतर साहित्य खरेदीसाठी ग्राहकांनी बाजारपेठेत गर्दी केल्याचे पहावयास मिळाले.

शुक्रवार, शनिवार आणि रविवार सलग तीन दिवशी बाजारपेठा बंद असल्याने काल सोमवारी खरेदीसाठी ग्राहक बाजारपेठेत उतरल्याचे चित्र दिसून आले असले तरी करोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे अनेकांच्या चेहर्‍यावर भितीचे सावट दिसून आले.

जिल्ह्यात सर्वाधिक करोना रुग्ण निफाड तालुक्यात आढळून येत असून संपुर्ण तालुका करोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. शहरी भागापेक्षा ग्रामिण भागात करोना रुग्णांंची संख्या झपाट्याने वाढत आहे. साहजिकच तालुक्यातील प्रमुख बाजारपेठांसह खेडेगावात देखील जनता कर्फ्यू सुरू करण्यात आला आहे.

संपूर्ण तालुक्यात तीन दिवस संपूर्ण बाजारपेठा बंद होत्या. साहजिकच सोमवारी काही प्रमाणात बाजारपेठा सुरू झाल्या. त्यातच आज मंगळवारी गुढीपाडवा अर्थात मराठी नववर्षाचा पहिला दिवस असल्याने नागरिकांनी खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली होती. किराणा, फळ विक्रेते, कृषी सेवा केंद्र, धान्य दुकान, मेडिकल, दवाखाने, हॉटेल, रसवंती गृहे, शितगृहे आदी दुकाने उघडल्याने गुढीपाडवा सणासाठी लागणारे साहित्य खरेदीला ग्राहकांनी पसंती दिली.

विशेषत: गुढी उभारण्यासाठी लागणारे हारडे-करडे, नविन कपडा, किराणा माल, नविन कपडे याबरोबरच मातीचे माठ खरेदीला ग्राहकांची पसंती दिसून आली. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिवनावश्यक वस्तुंच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याचे पहावयास मिळाले. शासनाने जाहिर केलेल्या दरापेक्षा अनेक व्यावसायिकांनी जादा दराने किराणा मालाची विक्री केली व अद्यापही अशी विक्री सुरूच असून यात सर्वसामान्य ग्राहक भरडला जात आहे.

करोना संसर्गामुळे मजुरांच्या हाताला काम नाही. अशातच ऋण काढुन सण करण्याची वेळ आली असतांनाच बाजारपेठेत ग्राहकांची लूट सुरू झाली आहे. शेतमालाला भाव मिळत नसतांनाच बाजारपेठेत मात्र शेतकर्‍यांकडून घेतलेल्या मालाची ‘मुँह मागे दाम’ विक्री होतांना दिसत आहे. काल निफाड, लासलगाव, पिंपळगाव बसवंत, सायखेडा बाजारपेठेत गर्दीचा माहोल दिसून आला. मागील वर्षी 15 ते 20 रुपये नगाप्रमाणे मिळणारे हारडे यावर्षी 40 ते 60 रुपये नगाप्रमाणे विकले गेले.

फळांचे भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढले असून खते-बियाणे यांचे भाव गगनाला भिडले आहे. त्यामुळे शेतकर्‍याचे जगणे देखील अवघड झाले आहे. करोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने गर्दीवर नियंत्रण आणून ठोस पावले उचलून तत्पर कार्यवाही करणे गरजेचे आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com